नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपाला यंदाच्या वर्षी देणग्यांच्या माध्यमातूनही मोठा धनलाभ झाला आहे. भाजपाला 2023-24 या वर्षात 2,244 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ही रक्कम 2022-2023 या आर्थिक वर्षात पक्षाला मिळालेल्या देणग्यांपेक्षा तिप्पट आहे. तर, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला 2023-2024 मध्ये केवळ 288.9 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांच्या तुलनेत ही रक्कम जास्त असली तरी काँग्रेसहून अधिक 580 कोटी रुपयांच्या देणग्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाला मिळाल्या आहेत. या पक्षाची स्थापना काँग्रेसच्या तुलनेत अलीकडे म्हणजे 2001 मध्ये झाली आहे.
भाजपाला काँग्रेसपेक्षा सात पटहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी सरकारने आणलेल्या निवडणूक रोख्यांमध्येही भाजपाला कोट्यवधी रुपयांच्या सर्वाधिक देणग्या मिळाल्या होत्या. ही योजना फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द केली होती. मात्र भाजपाकडे देणग्यांचा रोख चालू राहिला आहे.
2023-24 या वर्षात देशातील राजकीय पक्षांना कंपन्या, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट घराण्यांकडून 20,000 अधिक रुपयांच्या मिळालेल्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाली आहे. त्यात अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने देणग्या मिळवण्याच्या देशातील इतर सगळ्या पक्षांवर मात करत सर्वात जास्त 2,244 कोटी रुपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत. भाजपाला एकूण मिळालेल्या देणग्यांपैकी 850 कोटी रुपये इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यात भाजपाला सर्वाधिक प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून 723.6 कोटी रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. याचा अर्थ भाजपाला एकूण देणग्यांपैकी एक तृतियांश रक्कम या ट्रस्टकडून मिळाली आहे. याव्यतिरिक्त भाजपाला 127 कोटी रुपये ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्ट आणि 17.2 लाख रुपये आयन्झिगार्टिग इलेक्टोरल ट्रस्टकडून मिळाले आहेत. विशेष म्हणजे, प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने काँग्रेसलाही 156.5 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याचा एकूण देणग्यांच्या निम्म्याहून रक्कम काँग्रेसला प्रुडंटकडून मिळाली आहे.प्रुडंट ट्रस्ट काँग्रेसचा एकमेव देणगीदार ट्रस्ट आहे.
प्रुडंटने प्रादेशिक पक्षांना भरभरून देणग्या दिल्या आहेत. 2023-24 मध्ये बीआरएस आणि वायएसआर काँग्रेसला अनुक्रमे 85 कोटी आणि 62.5 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
आंध्र प्रदेशात सत्ताधारी पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) प्रुडंटकडून 33 कोटी रुपये मिळाले आहेत. द्रमुकला ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्ट आणि जयभारत ट्रस्टकडून 8 कोटी रुपये मिळाले आहेत.
विशेष म्हणजे, भाजपाला फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसकडून 3 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. ही कंपनी सँटियागो मार्टिन याच्या मालकीची आहे. तो भारताचा ‘लॉटरी किंग’ म्हणूनही ओळखला जातो. इलेक्टोरल बाँड्स मार्गाद्वारे फ्युचर गेमिंग हा सर्वात मोठा देणगीदार होता. सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली या कंपनीची ईडी आणि आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे.
भाजपा आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या देणग्यांमध्ये निवडणूक बाँडद्वारे मिळालेल्या रकमेचा समावेश नाही. निवडणूक बाँड योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, राजकीय पक्षांसाठी थेट देणग्या किंवा इलेक्टोरल ट्रस्टच्या मार्गाने मिळणार्या निधीवर जास्त भर दिला आहे. काही प्रादेशिक पक्षांनी मात्र निवडणूक बाँडद्वारे मिळालेल्या निधीचा स्वच्छेने खुलासा केला आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस)ला 495.5 कोटी रुपये, द्रमुकला 60 कोटी, वायएसआर काँग्रेसला 121.5 कोटी आणि झारखंड मुक्ती मोर्चाला (जेएमएम) 11.5 कोटी रुपये मिळाले आहेत. तेलगू देसमने यावर्षी आपल्याला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याचे जाहीर केले आहे.
इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये आम आदमी पार्टीला या वर्षात 11.1 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे घोषित केले आहे. गेल्या वर्षी आपला 37.1 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. सीपीएमला 2022-23 मध्ये 6.1 कोटी तर 2023-24 मध्ये 7.6 कोटी रुपये मिळाले आहे. मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीला 14.8 लाख रुपये मिळाले आहे. तर बीजेडीला शून्य व समाजवादी पक्षाने आपल्याला गेल्या वर्षी 33 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी केवळ 46.7 लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याचे जाहीर
केले आहे.
प्रुडंटच्या सर्वाधिक देणग्या भाजपाला
प्रुडंट हा देशातील सर्वात श्रीमंत निवडणूक ट्रस्ट असून, त्याला 90 टक्के देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळतात. पूर्वी हा ट्रस्ट सत्य इलेक्टोरल ट्रस्ट या नावाने ओळखला जात होता. 2022-23 मध्ये प्रुडंटला सर्वाधिक देणगी देणार्यांमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल यांचा समावेश होता. 2013-14 पासून तो भाजपाचा सर्वात मोठा देणगीदार असून, 2023 पर्यंत आपल्या 70 हून अधिक देणग्या भाजपाला दिल्या आहेत.