मुंबई – जोगेश्वरी पूर्वेकडील 500 कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी भाजपाचे किरीट सोमय्या यांनी घणाघाती आरोप केल्यानंतर शिंदे गटात गेलेले खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीनचिट दिली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर याच घोटाळ्यावरून मुंबई पोलीस आणि अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) त्यांना सळो की पळो करून सोडले होते. वायकर यांचे राहते घर आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. या दबावासमोर लोटांगण घालत वायकर शिंदे गटात दाखल झाले आणि थेट भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. आता पोलिसांनी या भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांना निर्दोष ठरवत क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. वायकर यांचा खासदारकीचा विजयही वादात आहे, त्यातही त्यांना दिलासा मिळेल, अशी खात्री अनेकांना वाटत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला. 2021 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडलगतच्या वेरावली गावात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंड लाटून वायकर त्या जागेवर 500 कोटी रुपये खर्च करून पंचतारांकित हॉटेल उभारत आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला. तेव्हापासून वायकर चौकशीच्या फेर्यात अडकले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंता संतोष मांडवकर यांनी लगेच आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रार दिली. आझाद मैदान पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरू केली. काही दिवसांतच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना ईडीने या प्रकरणात उडी घेतली. ईडीने रवींद्र वायकर यांच्याविरूध्द मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) गुन्हा दाखल केला. वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर, आर्किटेक्ट अरूण दुबे, व्यवसायातील भागीदार आसू नेहलानी, प्रीथपाल बिंद्रा आणि राज लालचंदानी यांना ईडीने सहआरोपी केले.
तपासादरम्यान ईडीच्या पथकांनी 9 जानेवारी रोजी एकाच वेळी वायकर यांचे ग्रीन फिल्डस इमारतीतील राहते घर तसेच त्यांच्याशी आणि त्यांच्या भागीदारांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. छाप्यादरम्यान ईडीच्या अधिकार्यांनी वायकर यांच्या घरातून काही कागदपत्र आणि त्यांच्या बँक खात्यांचा तपशील ताब्यात घेतला. त्याची छाननी केल्यानंतर वायकर यांना ईडीने आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी पाच-सहा तास वायकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. ईडीने चौकशीसाठी दुसर्यांदा समन्स बजावले तेव्हा वायकर प्रकृतीचे कारण देत ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा समन्स पाठविले.
ईडीच्या चौकशीचा हा धडाका पाहून वायकर गलितगात्र झाले. शिंदे गटात प्रवेश करण्याच्या दहा-पंधरा दिवस आधी निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना बोलावून त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही, माझ्या छातीत स्टेंट बसवले आहेत. मी एक दिवसही तुरुंगात जिवंत राहू शकत नाही, असे सांगत शिंदे गटात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर वायकर यांची चौकशीच्या ससेमिर्यापासून सुटका होण्यास सुरुवात झाली. वायकर यांनी मुंबई महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. वायकर त्यावेळी शिंदे गटात सामील झाले असल्याने म्हणजेच भाजपाच्या वळचणीला गेल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली. महापालिकेने त्यांच्यावरील आक्षेप मागे घेत असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले. वायकर यांनी नवा प्रस्ताव पालिकेत सादर केला. तो पालिकेने स्वीकारला आणि कोर्टात तशी माहिती दिली. त्याच वेळी वायकर यांची या प्रकरणातून सुटका होणार असे बोलले जाऊ लागले होते. आता आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना निर्दोष ठरवत क्लोजर रिपोर्ट (सी समरी रिपोर्ट) सादर केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. वायकर भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त झाले. मुंबई महानगरपालिकेने गैरसमजातून वायकर यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली होती, असा निष्कर्ष पोलिसांनी या क्लोजर रिपोर्टमध्ये मांडला आहे.
किरीट सोमय्यांचे तोंडावर बोट
वायकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करून रान उठविणारे किरीट सोमय्या यांना वायकरांना क्लीनचिट मिळाल्याबद्दल मीडियाने छेडले असता त्यांनी एक शब्दही बोलण्यास नकार दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मी त्यावर काहीही भाष्य करणार नाही, असे सोमय्या म्हणाले.
आता फक्त दाऊदच उरला-राऊत
आता फक्त अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला क्लीनचिट देणे बाकी राहिले आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वायकर यांच्या क्लीनचिटवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. वायकर जेव्हा आमच्या पक्षात होते तेव्हा भाजपाला ते भ्रष्टाचारी वाटत होते. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्यामागे पोलीस आणि ईडीचा ससेमिरा लावून त्यांना घाबरवून आपल्याकडे येण्यास भाग पाडले. आता भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून वायकर साफ स्वच्छ होऊन निघाले आहेत, असे राऊत म्हणाले. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपण खोट्या गुन्ह्यात अडकवून घाबरवतो, हे आता भाजपाने जाहीरपणे मान्य करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.
सत्य हे सत्यच असते – वायकर
ज्या प्राधिकरणाने मला याप्रकरणी लेटर पाठविले होते त्या लेटरला मी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावेळी आपण हे पत्र मागे घेत असल्याचे शपथपत्र प्राधिकरणाने न्यायालयात सादर केले. तेव्हा खरेतर मला क्लीनचिट मिळाली होती. त्यामुळे आता पोलिसांनी क्लीनचिट दिली त्याबद्दल मला नवल वाटत नाही. सत्य हे सत्यच असते. ते कधी ना कधी बाहेर येतेच, असे वायकर यासंदर्भात मीडियाशी बोलताना म्हणाले.