पंढरपूर
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घडामोडींनी वेग घेतला असून पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील इच्छुक उमेदवार माजी आमदार कै. भारतनाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली.
भालके हे महविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाले होते. सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदावार प्रणिती शिंदे यांचा त्यांनी प्रचार केला होता. शरद पवार यांचे निकटवर्तीय अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यामुळेही भालकेंनी शरद पवारांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात झालेल्या गेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हे पराभूत झाले असले तरी त्यांनी तेव्हा १ लाख ५ हजार मते घेतली होती. त्यानंतर ते नाराज होऊन चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसमध्ये गेले होते. आज बारामतीच्या गोविंद बाग या शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे ते परत एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येणार असल्याची चर्चा सुरु आहे.