ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा दणदणीत विजय भारतीय वंशाच्या सुनकांची सत्ता संपुष्टात

लंडन – ब्रिटनमधील संसदीय निवडणुकीत 14 वर्षांनंतर सत्तांतर घडले असून, भारतीय वंशाचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कन्झर्व्हेटिव्ह) दारुण पराभव करत मजूर (लेबर) पक्षाने सत्ता हस्तगत केली आहे. किएर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने 412 जागा जिंकत बहुमताचा आकडा पार केला आहे. ऋषी सुनक यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच किएर स्टार्मर हे सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. त्यानंतर ब्रिटनमध्ये सत्तेचे नवे पर्व सुरू होईल.
ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे लेबर पार्टीचे 61 वर्षीय किएर स्टार्मर यांनी हॉलबॉर्न आणि सेंट पॅनक्रस या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विजयानंतर विजयी भाषण करताना स्टार्मर म्हणाले की, मी तुमचा आवाज होईन. मी तुम्हाला पाठिंबा देईन. मी तुमच्यासाठी दररोज लढेन. ग्रेट ब्रिटनच्या इतिहासात हा महत्त्वाचा दिवस असून, आपण आजपासून देशाच्या नवनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. मजूर पक्ष पुन्हा एकदा देशाची सेवा करण्यास सक्षम आहे.
या निवडणुकीत मजूर पक्षाला एकूण 412 जागा मिळाल्या असून, ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला केवळ 121 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत सुनक आपल्या रिचमंड या मतदारसंघातून विजयी झाले असले तरी त्यांच्या सरकारमधील 9 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचाही पराभव झाला आहे. निकाल यायला लागल्यानंतरच ऋषी सुनक हे आपल्या मतदारसंघातून लंडनला गेले. त्यांनी इंग्लंडचे राजा चार्ल्स यांची भेट घेऊन आपला राजीनामा दिला. आपला पराभव स्वीकारताना दिलेल्या संदेशात सुनक यांनी म्हटले आहे की, देशाला मी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे सांगू इच्छितो की, मला माफ करा. मी माझ्या या कामासाठी माझे सर्वस्व दिले आहे, परंतु तुम्ही स्पष्ट संकेत दिले आहेत की, युनायटेड किंगडमचे सरकार बदलले पाहिजे. तुमचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. या नुकसानीची जबाबदारी मी घेतो. या निकालानंतर मी पक्षाचे नेतेपद सोडत आहे. ब्रिटिश जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. यातून खूप काही शिकण्याची गरज आहे. माझ्या हातात सत्ता आल्यानंतर मी आर्थिक सुधारणांवर भर दिला. देशाचा आर्थिक दृष्टीकोन या पक्षासाठी महत्त्वाचा होता. जेव्हा मी पहिल्यांदा येथे तुमचा पंतप्रधान म्हणून उभा राहिलो, तेव्हा माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आमच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणणे होते, असे मी तुम्हाला सांगितले आहे. महागाई पुन्हा वाढली आहे, तारण दर घसरले आहेत. परंतु, माझा विश्वास आहे की, हा देश 20 महिन्यांपूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि मजबूत आहे.
अर्थकारणातील तज्ज्ञ असलेल्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. गेल्या 16 वर्षांत जीडीपीच्या दरात नोंदवलेली 46 टक्के इतकी वाढ त्यांच्या कार्यकाळात केवळ 4.3 टक्क्यांवर आली. ब्रिटनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे लोक नाराज झाले. त्यातही ब्रिटनमधील राहणीमानाच्या मुल्यातही मोठी वाढ झाली. सरकारच्या विरोधात लोकांनी आपली नाराजी मतदानातून व्यक्त केली. देशातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय आरोग्यसेवेकडेही सुनक यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे इंग्लंडमध्ये डॉक्टरांचे संप पाहायला मिळाले. सुनक यांनी राबवलेली अनेक धोरणे ब्रिटिश नागरिकांना रुचली नाहीत.
गेल्या काही काळापासून घसरलेली अर्थव्यवस्था, सार्वजनिक सेवेची वाताहत, बेरोजगारी यासारख्या प्रश्नांनी जनता त्रस्त झाली होती. ऋषी सुनक यांनी मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक जाहीर केली होती. परंतु, या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. या निवडणुकीत हुजूर पक्षाचा पराभव होणार, असा कौल सगळ्याच एक्झिट पोलमधून व्यक्त झाला होता.

वकील ते पंतप्रधान
पंतप्रधानपदी विराजमान होणारे किएर स्टार्मर यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून झाले आहे. ते पेशाने वकील असून, त्यांनी 2008 ते 2013 या काळात इंग्लंड आणि वेल्समध्ये वकिली केली आहे. त्यांनी अनेक गरजवंतांना कायद्याची मदत केली आहे. अनेक सरकारी विभागांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले आहे. 2015 साली ते पहिल्यांदा खासदार झाले. गेल्या चार वर्षांपासून ते इंग्लंडचे विरोधी पक्षनेते होते. एप्रिल 2020 मध्ये मजूर पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. मजूर पक्षाचे नेते म्हणून जबाबदारी स्वीकारताना ते म्हणाले होते की, या महान पक्षाला नवीन आशा आणि आत्मविश्वासाने एका नव्या युगात घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top