मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९ कोटी ७८ लाख ३० हजार रुपये खर्च करणार आहे.या खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्याची पालिकेने सुरू केली आहे.
हा पोहोच रस्ता बांधण्यासाठी पालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा उणे १२.६२ टक्के इतक्या लघुत्तम दराची निविदा आली आहे.या निविदेच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कामासाठी तांत्रिक सल्लागाराला एक कोटी सात लाख ९६ हजार रुपये दिले जाणार आहेत. पूल खात्याच्या प्रमुख अभियंत्यांनी या कामाचा प्रस्ताव तयार केला होता. तो आता पालिकेच्या स्थायी तसेच सुधार समितीच्या म्हणजेच विद्यमान प्रशासकांच्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.मध्यंतरी बेलासिस पुलाच्या रिगर्डरिंगचे काम फेरेरे पुलाच्या धर्तीवर करता येईल,असा अहवाल व्हीजेटीआय या संस्थेने दिला होता.त्यानुसार हे काम करण्यासाठी एमआरआयडीसीएल कंपनीला कळविण्यात आले.मात्र या कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर बेलासिस पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करण्याची तयारी पश्चिम रेल्वेने दाखविली. त्याला संबंधित प्राधिकरणांनी मंजुरीही दिली होती.पश्चिम रेल्वे प्रशासनाने बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याच्या मजबुतीकरणाची व्यवहार्यता तपासली. मात्र या कामासाठी बाजूला जागा उपलब्ध नसल्याचे त्यांना आढळले.