पाटणा – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पूल कोसळण्याच्या अनेक घटनांप्रकरणी बिहार सरकारने काल १४ अभियंत्यांना निलंबित केले. या घटनांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने जलसंपदा विभागाकडे चौकशीसाठी अहवाल सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चैतन्य प्रसाद यांनी दिली.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चैतन्य प्रसाद यांनी सांगितले की, या प्रकरणांची चौकशी करताना या अभियंत्यांनी आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा केला असून त्यांनी कामावर योग्य प्रकारे देखरेख ठेवली नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील अनेक छोटे पूल कोसळले. शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तीन कार्यकारी अभियंत्यांचाही समावेश आहे.गेल्या १७ दिवसांत सिवान, सारण, मधुबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज जिल्ह्यात एकूण १० पूल कोसळले आहेत.
दरम्यान,बिहार सरकारने महाआघाडीच्या काळात दिलेले ३,६०० कोटी रुपयांचे ग्रामीण पाणीपुरवठा कामांचे कंत्राट रद्द केले आहे.या कंत्राटाच्या निविदा देताना योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही आणि पुरेशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आला नसल्याचे चौकशी आढळून आले आहे,अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी मंत्री नीरज कुमार सिंह यांची काल पत्रकारांशी बोलताना दिली