पाटणा – बिहारमधील आपल्या धडाकेबाज कामामुळे प्रकाशात आलेले मराठी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला आहे. त्यांच्या समाज माध्यमावरील पोस्टमध्येही त्यांनी ही माहिती दिली.
शिवदीप लांडे हे बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांनी पूर्णिया जिल्ह्याची आयजी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. तिरहुत सारख्या मोठ्या भागातून त्यांना पूर्णियाला पाठवण्यात आल्याने ते नाराज होते. त्यांनी पदाच्या राजीनाम्याबरोबरच भारतीय पोलीस सेवेचाही राजीनामा दिला आहे.
शिवदीप लांडे हे मूळ अकोला जिल्ह्यातील आहेत. पुरंदर मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत. ते गेल्या १८ वर्षांपासून बिहारमध्ये कार्यरत होते. मुंबईत प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी अमली पदार्थ विरोधी पथकात काम केले आहे. त्यावेळी त्यांनी प्रभावी कामगिरी करत ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडले होते. तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त असताना अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आणले होते.
काही दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिला होता. शिवदीप लांडे राजीनामा दिल्यानंतर आता ते कोणती भूमिका घेणार आहेत याकडे लक्ष लागले आहे. आपण व्यक्तिगत कारणांसाठी आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवदीप लांडे हे राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.