पाटणा- बिहार राज्यातून वाहणार्या गंगा नदीचे पाणी लोकांना स्नान करण्यासाठी योग्य नाही.कारण या पाण्यामध्ये ‘जिवाणू’ ची संख्या अधिक आहे,असा निष्कर्ष बिहार सरकारच्या अहवालातून काढण्यात आला आहे.राज्याचे आर्थिक सर्वेक्षण नुकतेच राज्य विधिमंडळात मांडण्यात आले.या सर्वेक्षणात ही माहिती दिली आहे.
राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे की, गंगेतील पाण्याचा दर्जा लक्षात घेता या पाण्यात मोठ्या प्रमाणात जिवाणू आहेत.गंगेच्या किनार्यावर असलेल्या शहरातील मलनिस्सारण व स्थानिक सांडपाण्यामुळे हे जिवाणू वाढले आहेत.याबाबत बिहार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डी.के.
शुक्ला म्हणाले की,खरे तर गंगेच्या पाण्यातील ही जिवाणूची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. मलावर कोणतीही प्रक्रिया न करता ते पाणी गंगेत सोडले जात असल्याने हे जिवाणू वाढले आहेत. वास्तविक १०० मिली पाण्यात २५०० एमपीएन जिवाणूची मर्यादा आहे.मात्र त्यापेक्षा अधिक जिवाणू या पाण्यात आहेत.त्यामुळे हे पाणी आंघोळ करण्यास योग्य नाही.बिहारमधील गंगा नदीच्या काठावर वसलेल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये बक्सर,छापरा (सरन), दिघवारा, सोनपूर, मणेर, दानापूर, पाटणा, फतुहा, बख्तियारपूर, बारह, मोकामा, बेगुसराय, खगरिया, लखीसराय, मनिहारी, मुंगेर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर आणि कहलगाव यांचा समावेश आहे.