मुंबई – शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच आता शरद पवार गटाच्या सात खासदारांना ‘बाप-लेकीला सोडून त्यांनी दादांबरोबर या’ असा प्रस्ताव अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. तटकरेंनी या शब्दांत प्रस्ताव दिल्याने संतप्त झालेल्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांना फोन करत तटकरेंबाबत तक्रार केली.
अजित पवार गटाचा लोकसभेत फक्त एक उमेदवार विजयी झाला. केंद्रात भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकार सत्तेत आले. मात्र अजित पवार गटाचा एकमेव खासदार असल्यामुळे पक्षाला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही. केंद्रात मंत्रिपद हवे असेल तर किमान पाच खासदारांचा कोटा लागतो. त्यामुळे आता अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या गटातील खासदारांना स्वत:कडे वळवण्याचे प्रयत्न होत आहेत. ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे सुनिल तटकरे यांनी दिल्लीत डिसेंबर महिन्यात झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवारांच्या पक्षातील सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. त्याचबरोबर याची बाहेर वाच्यता करु नका असेही सांगितल्याची माहिती आहे. मात्र या खासदारांनी ऑफर नाकारून ही गोष्ट सुप्रिया सुळे आणि पक्ष प्रमुख शरद पवारांना सांगितली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करुन सुनिल तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाकडून खासदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चांवर आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ते खासदारांना म्हणाले, बाप-लेकीला बाजूला ठेवा आणि आमच्याकडे या. एकीकडे म्हणतात की, शरद पवार आमच्या देव्हार्यात आहेत. दुसरीकडे अशी कृत्ये करतात. या लोकांच्या मनात काय उलट-सुलट चालू आहे मला काहीच कळत नाही. एकीकडे बोंब मारतात की एकत्र येत आहोत. मग खासदारांना कशाला पळवता? ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत शरद पवार यांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवे आहे. म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत.
शरद पवार गटाचे खासदार अमर काळे म्हणाले की, अजित पवार गटाकडून आमच्या 7 पैकी एकाही खासदाराला त्यांच्यासोबत जाण्याचा प्रस्ताव आला नाही. माध्यमांमध्ये ही चर्चा सुरु आहे यात कोणतेही तथ्य नाही. पण सोनिया दुहान यांनी दिल्लीतील हिवाळी अधिवेशनादरम्यान आमच्या 7 खासदारांना संपर्क साधला होता. आणि त्यांनी आपण अजित पवारांसोबत चला असा आग्रह केला होता. जर विकास कामे करायची असतील तर तुम्हाला अजित पवारांसोबत गेल्याशिवाय पर्याय नाही असेही त्या म्हणाल्या होत्या. आम्ही याबाबत सुप्रिया सुळे यांना मी जेव्हा सांगितले तेव्हा त्या फक्त हसल्या. आमच्याशी संपर्क केला जातोय ही माहिती त्यांना आधीपासून होती. निलेश लंके आणि बाळ्या मामा यांनाही ऑफर आली , मात्र सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो, बोलतो , परंतु राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही, असे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके म्हणाले.
तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खासदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा फेटाळला. ते म्हणाले की, विधानसभेतील पराभवानंतर त्यांची स्थिती काय आहे ते दिसून आले. मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. त्यामध्ये कधीही बाप-लेक असा शब्दप्रयोग नाही. मी कुणाशीही संपर्क केला नाही. दिल्लीत अनेक कार्यक्रमात खासदार भेटतात. त्यावेळी काही चर्चा होते. पण अशा प्रकारचा संपर्क केलेला नाही. आमच्याकडून कुणालाही फोन गेला नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न आहे. सोनिया दुहान या काही आमच्या पक्षात नाहीत. त्यांना आमच्याकडून कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबद्दल मला काही माहिती नाही.