मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठाने बदलापूर अत्याचार प्रकरणात अत्यंत खळबळजनक आदेश दिला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा जबाब नोंदविण्यापूर्वी, त्याची साक्ष होण्यापूर्वी त्याला पोलीस गाडीत घालून पाच पोलिसांनी त्याला गाडीतच घेरत त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. पोलिसांची ही भयंकर कृती न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज कोर्टात सादर केलेल्या अहवालात उघड झाली. यानंतर न्यायालयाने या पाचही पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली होती. बदलापूरकर रस्त्यावर उतरून न्याय मागत होते. त्यांनी लोकलसेवाही दिवसभर अडवून ठेवली होती. या तप्त वातावरणात शाळेत सफाईचे काम करणाऱ्या अक्षय शिंदे याला आरोपी म्हणून अटक करण्यात आले. आमचा मुलगा निर्दोष असून, त्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असे अक्षयचे आईवडील सातत्याने सांगत होते. मात्र त्यांच्या म्हणण्याला कोणीही महत्त्व दिले नाही. अक्षयला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याचा रितसर जबाब घेण्यापूर्वी आणि त्याच्या बोलण्याचा तपास सुरू होण्यापूर्वीच कोर्टात हजर करण्याच्या बहाण्याने त्याला पोलीस गाडीत घालून कोर्टात न्यायची शक्कल लढविण्यात आली. त्याच्या पत्नीने त्याच दिवशी आपल्यावर 2021 साली अक्षयने अत्याचार केल्याचा गुन्हा नोंदविला होता, ही आश्चर्यकारक बाब आहे. त्याच प्रकरणात त्याला चौकशीसाठी 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा कारागृहातून नेण्याचा कट रचण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी वादग्रस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना या कामासाठी बोलाविण्यात आले होते. पोलीस गाडीतून नेतानाच चकमक झाली आणि त्यात अक्षयचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या गुडघ्याला गोळी लागल्याचे सांगण्यात आले. निरीक्षक संजय शिंदे आणि नीलेश मोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात येऊन दोन दिवसांनी सोडण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी कोणतीही शहानिशा न करता त्वरित रुग्णालयात जाऊन या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले होते. मात्र या चकमकीची एकूण परिस्थिती पाहता ही चकमक बनावट होती असा संशय निर्माण झाला होता. अक्षयच्या आईने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने न्यायदंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला. हा चौकशी अहवाल आज न्यायालयात सादर करण्यात आला.
या अहवालात धक्कादायक माहिती आहे. त्यात म्हटले आहे की, अक्षय शिंदे याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या कमरेला लावलेली पिस्तुल काढण्याचा प्रयत्न केल्याचा कोणताही पुरावा नाही. अक्षय शिंदे याचे पिस्तुलावर कसलेही ठसे नाहीत. अक्षय शिंदेने निलेश मोरे यांच्यावर गोळी झाडल्याचा कोणताही पुरावा नाही. निलेश मोरे यांनी जीन्स पँट घातली होती. त्या पँटवर गोळीच्या पावडरीची कुठलीही निशाणी नाही. यामुळे अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा हा पूर्णपणे खोटा आहे. त्याने कोणत्याही प्रकारचा हल्ला केलेला नसताना त्याच्यावर अनावश्यक बळ वापरण्याची कोणतीही गरज नव्हती. व्हॅनमधील चार पोलीस अधिकारी त्याला सहज नमवू शकत होते. असे असताना पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ही हत्या आहे. याबद्दल पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे, हवालदार हरिष तावडे आणि पोलीस व्हॅनचा ड्रायव्हर सतिश खताळ यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवून कारवाई व्हावी, असा आदेश आज न्यायालयाने दिला.
सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी चौकशी अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाकडे पाठविण्यासह प्रोटोकॉलनुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले. तर, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले की, ही बनावट चकमक असून एकप्रकरची हत्या असल्याचे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आले आहे.
यासंदर्भात आम्ही क्रिमिनल रिपिटीशन दाखल केली होती. त्यात आम्ही हा फेक एन्काऊंटर असून मर्डर आहे, असा दावा केला होता. गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने भूमिका घेतली की, जोपर्यंत या प्रकरणी चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील पाऊल उचलणार नाही, अशी सरकारची भूमिका होती. आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो अंतिम अहवाल दिला, त्यात फेक एन्काऊंटर झाले असून ही हत्याच आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केले की यात एफआयआर झाला पाहिजे.
अक्षय शिंदेच्या आईने प्रतिक्रिया दिली की, माझ्या मुलाने गुन्हा केलाच नव्हता, माझा मुलगा सत्य होता आणि हे सत्यच आहे. मी त्याची आई आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. माझ्या मुलावर बलात्काराचा आरोप केला होता, आणि त्यानंतर त्याचा एन्काऊंटर केला, त्या लोकांनी त्याला मारून टाकले. ज्यांनी गुन्हा केला, त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षा मिळेल. आजच्या कोर्टात सादर केलेल्या अहवालानंतर बदलापूर अत्याचार प्रकरणात सीआयडीला पुन्हा तपास करावा लागणार आहे. या प्रकरणातील आरोपी नेमका कोण होता? या प्रश्नाचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. कोणालातरी वाचविण्यासाठी अक्षय शिंदेला गोवण्यात आले, हा आरोप सत्य आहे का? याचे उत्तर मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
संजय शिंदेबद्दल संशय
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांना बोलाविल्याने सर्वांच्या मनात संशय निर्माण झाला होता. संजय शिंदे हे वादग्रस्त पोलीस अधिकारी आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. अरुणकुमार टिकू याच्या खुनाचा आरोपी विजय पालांडे याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप संजय शिंदे यांच्यावर होता. पालांडे याच्या गाडीत संजय शिंदेचा गणवेश सापडला होता. याप्रकरणी त्याचे निलंबन करण्यात आले होते. 2014 साली त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले.