मुंबई – देशात सर्वांच्या प्रयत्नाने पोलिओचे उच्चाटन करण्यात आले. आता फॅटी लिव्हर या आजाराचेही आपण पूर्णपणे उच्चाटन करू, असा विश्वास अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला. डॉक्टर उपचारांबरोबरच रुग्णाला जो दिलासा देतात तो फार महत्त्वाचा असून ५० टक्के आजार त्यानेच दूर होतो अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांच्या कार्याचाही गौरव केला. ते काल केईएम रुग्णालयाच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, पोटविकारतज्ज्ञ जॉ. जयंत बर्वे, डॉ. आकाश शुक्ला उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केईएम रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या फॅटी लिव्हर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अमिताभ बच्चन यांना फॅटी लिव्हर आजारासंबंधी जनजागृती करण्यासाठीच्या मोहिमेचे ब्रॅण्ड अम्बेसॅडर म्हणून घोषित करण्यात आले. अमिताभ बच्चन यांनी यावेळी वैद्यकीय पेशाचे कौतुक केले. ते म्हणाले की, तुम्ही आहात म्हणून भविष्य सुरक्षित आहे, आरोग्य आहे. मला जेव्हा काही त्रास होतो तेव्हा मी डॉ. जयंत बर्वे यांच्याकडे जात असतो. गेल्या गेल्या ते म्हणतात की, पाच मिनिटांत उपाय करूया. त्यांच्या या शब्दानेच मला बरे वाटते. कोविडशी आपण जो लढा दिला तो सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाला. देशोदेशीचे डॉक्टर आपला अनुभव एकमेकांना सांगून त्यावर उपचार शोधत होते. फॅटी लिव्हर या आजारासंबंधी मला माहिती आहे. माझे स्वतःचे यकृतही २५ टक्के काम करते आहे. त्यामुळे या आजारासंबंधी जनजागृती करायला मला आवडेल. आपण काही वर्षात देशाला पोलिओमुक्त करू शकलो, तर याही आजारातून लोकांना मुक्त करता येईल असा मला विश्वास आहे. या वेळी त्यांनी केईएम रुग्णालयाच्या शंभर वर्षाच्या प्रवासाचाही त्यांनी गौरव केला.
डॉ. जयंत बर्वे म्हणाले की, अमिताभ बच्चन यांची समाजात विश्वासार्हता आहे. ते लोकांना जे सांगतात ते त्यांना पटते. फॅटी लिव्हर वर योग्य आहार, व्यायाम व सकारात्मक विचार हाच खरा उपाय आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अनेक वर्षांच्या जीवनशैलीमधून त्यांची संयमी जीवनपद्धती दाखवली आहे. त्यामुळे या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आमच्यासाठी तेच योग्य होते. कोणत्याही चांगल्या कामाला ते नाही म्हणत नाहीत. त्यांनी हे पद स्वीकारल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
यावेळी डॉ. अशोक आकाश शुक्ला यांनीही फॅटी लिव्हर आजाराविषयी माहिती दिली. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी आभार मानले. यावेळी मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणीही उपस्थित होते.