सोलापूर – प्रयागराज कुंभमेळ्यात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार महेश कोठे मित्रांसह प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव प्रयागराजहून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे.
याशिवाय, सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात महेश कोठे यांची ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून ओळख होती.त्यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते. सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पाडल्या. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात त्यांनी प्रवास केला. दरम्यान, कोठे यांच्या अकाली निधनामुळे राजकीय तसेच सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळामध्ये मोठा शोक व्यक्त केला जात आहे.