प्रयागराज महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानावेळी दुर्घटना! चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू! शेकडो जखमी! प्रशासनावर आरोप


प्रयागराज- प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन सुमारे 30 हून अधिक भाविकांना जीव गमवावा लागला. तर शेकडो भाविक गंभीररित्या जखमी झाले. या घटनेमुळे कुंभमेळा परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक कुटुंबे प्रचंड गर्दीत विखुरली गेली. ज्यांनी आपले नातेवाईक गमावले ते दुःखात आहेत. या दुर्दैवी घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेल्या भाजपाने कुंभमेळ्याचे जोरदार मार्केटिंग केले. अनेक विशेष रेल्वे आणि बसगाड्या सोडल्या. कोट्यवधीचा खर्च केला. मात्र तेथील नियोजन करण्यात अपयशी ठरले. चेंगराचेंगरी झाली तेव्हा पोलीस उपस्थितही नव्हते. दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर या दुर्घटनेची न्यायिक आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे.
काल मौनी अमावास्या असल्याने या पवित्र समयी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी संध्याकाळपासूनच कोट्यवधी भाविक महाकुंभ मेळ्याला आले होते. बहुतांश भाविकांना संगमावरच अमृत स्नान करायचे होते. त्यामुळे संगमावर जाण्यासाठी भाविकांची रीघ लागली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही भाविकांनी या परिसरात लावण्यात आलेले बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असे सांगितले जाते. मात्र तुफान गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. वृद्ध पुरुष-महिला, लहान मुले अक्षरशः पायाखाली तुडवली गेली. या चेंगराचेंगरीत गंभीररित्या जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर काही काळ अमृत स्नानाला स्थगिती देण्यात आली. आखाड्यांनीही आपण अमृत स्नान करणार नसल्याचे जाहीर केले. मात्र काही वेळाने हा निर्णय बदलला आणि आखाड्यांनी मिरवणूक न काढता साधेपणाने जाऊन संगमात स्नान केले. त्यांच्यासाठी संपूर्ण रस्ता रिकामा करण्यात आला होता.
गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे आपल्या कुटुंबियांपासून दुरावलेल्या एका वृद्ध महिलेने आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली की, लोक सैरावैरा पळत होते. काही महिला, मुले, वृद्ध माणसे धावताना अडखळून पडत होती. त्यांना तुडवत लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व होत असताना पोलीस दूर उभे राहून फक्त बघत होते. माझे सामानही कुठे गायब झाले आहे. येथे कसलीही सोय नाही. भूक भागवण्यासाठी आणि घरी परत जाण्यासाठी हातात एक पैसाही उरलेला नाही. अशा परिस्थितीत कुटुंबियांचा शोध तरी कसा घेणार असा प्रश्न आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून काहीही मदत मिळत नाही, असेही महिला म्हणाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्यातील या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले. दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असे मोदी एक्स पोस्टमध्ये म्हणाले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चार वेळा फोनवरून संवाद साधला. घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश मोदी यांनी दिले. यासंदर्भात आवश्‍यक ती सर्व मदत केंद्र सरकारच्या वतीने दिली जाईल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीदेखील या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. अपेक्षेपेक्षा जास्त भाविक आल्याने ही दुर्घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
सकाळी दहा वाजेपर्यंत तीन कोटी भाविकांनी अमृत स्नान केले आहे, असा दावा करतानाच सर्वांनी संगमावर अमृतस्नान करण्याचा आग्रह धरू नये, असे आवाहन त्यांनी केले. महाकुंभ मेळ्याच्या पंधरा-वीस किलोमीटरच्या परिसरात गंगा नदीवर अनेक घाट आहेत. तिथे स्नान करण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. प्रत्येकाने संगमावर स्नान करण्याऐवजी जवळच्या घाटावर स्नान करावे. तेथील पाणीदेखील गंगा नदीचेच आहे. तेही संगमावरील पाण्याएवढेच पवित्र आहे. तिथे स्नान केल्यावर सारखेच पुण्य लाभेल, असे योगी भाविकांना उद्देशून म्हणाले.
भाविकांना अन्यत्र स्नानाचा सल्ला
संत-महंतांचे मात्र संगमावरच स्नान

दुर्घटनेमुळे काही काळ अमृत स्नानाला स्थगिती दिलेली असताना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी, योगगुरु बाबा रामदेव, महंत रामभद्राचार्य यांच्यासह तेरा आखाड्यांचे संत-महंत सर्वसामान्य भाविकांना विनंती करत होते की, तुम्ही ज्या घाटावर आहात त्याच घाटावर स्नान करा. संगमावरच स्नान करण्याचा हट्ट करू नका, त्याऐवजी अन्य घाटांवर स्नान करा. आज स्नान करता आले नाही तर वसंती पंचमीला स्नान करा. मात्र संत-महंत यांनी स्वतः संगमावरच जाऊन स्नान केले. त्यांच्यासाठी संगमस्थळी जाण्यासाठी एक प्रशस्त मार्ग मोकळा करून ठेवण्यात आला होता. त्या मार्गावर सर्वसामान्य भाविकांना प्रवेश नव्हता. संत-महंतांना त्याच मार्गावरून जात संगमावर अमृत स्नान केले.
आज जी दुर्घटना घडली त्याबाबत अनेक नेत्यांनी योगी प्रशासनावर टीका केली. भाजपाच्या नेत्या माजी मंत्री निरंजन देवी यांनी तर योगी सरकारला घरचा आहेर दिला. एवढ्या प्रचंड संख्येने लोक महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहतील याचा अंदाज असताना त्याचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची जबाबदारी लष्कराकडे का सोपवली नाही, असा थेट सवाल करत महाकुंभच्या उर्वरित काळासाठी नियोजन लष्कराकडे सोपवावे, अशी मागणी केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना दुर्घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले. राज्य सरकारने कुंभमेळ्याचे केलेले चुकीचे व्यवस्थापन, ढिसाळ नियोजन आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी सर्वसामान्य भाविकांच्या वावरावर घालण्यात आलेले निर्बंध ही या दुर्घटनेची मुख्य कारणे आहेत, असे राहुल
गांधी म्हणाले.
महाकुंभ मेळ्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य भाविक प्रयागराजला आले आहेत. त्यांना विचारले असता त्यांनी तेथील अव्यवस्थेचा पाढा वाचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा गाजावाजा करत महाकुंभ मेळ्यात सामील होण्याचे निमंत्रण दिले. पण येथे आल्यावर अत्यंत वाईट अनुभव आला. येथे कसलीही व्यवस्था नाही.
राज्या-राज्यांमधून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्यामुळे महाकुंभ मेळाव्याला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली. मात्र या संभाव्य गर्दीचे योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरलेल्या योगी सरकारचा मी धिक्कार करते, असे महाराष्ट्रातून प्रयागराजला आलेल्या एका महिलेने सांगितले.
दरम्यान या दुर्घटनेची आता न्यायिक आयोगाकडून चौकशी केली जाणार आहे. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
योगींच्या निवेदनात मृतांचा उल्लेख नाही
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सकाळी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी सकाळी दहा वाजता संगमस्थळी येऊन घडलेल्या दुर्घटनेबद्दल निवेदन केले. घडलेली घटना दुर्दैवी असून, जखमी झालेल्या भाविकांवर उपचार सुरू आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन योगी यांनी केली. मात्र आपल्या निवेदनात त्यांनी दुर्घटनेत किती लोकांचा बळी गेला याचा एका शब्दाने उल्लेख केला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top