कुर्स्क- रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी काल युक्रेनच्या ताब्यात असलेल्या कुर्स्क भागाला भेट दिली. हा भाग लवकरात लवकर युक्रेनच्या ताब्यातून मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी लष्करी अधिकार्यांना केले. विशेष म्हणजे पुतीन यांनी लष्करी गणवेषात सैनिकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला.
यावेळी पुतीन म्हणाले की, दोन्ही देशांच्या सीमा भागात संरक्षण व्यवस्था तयार करण्याची गरज आहे. या ठिकाणाहून युक्रेनच्या सैन्याला मागे धाडा. त्यांचा या भागात पाडाव करा. पुतीन यांची ही भेट यासाठी महत्त्वाची ठरली आहे की नेमके याच वेळेस अमेरिकेच्या अधिकार्यांचे एक शिष्टमंडळ युक्रेन व रशिया यांच्यात युद्धबंदीचा प्रयत्न करण्यासाठी रशियात येत आहेत. पुतीन यांच्या कुर्स्क भेटीनंतर रशियाने या भागात आपले हल्ले वाढवले असून, दुसरीकडे युक्रेनही रशियाच्या आरमारावर जोरदार प्रहार करण्याच्या तयारीत आहे. यामुळे युध्दबंदीचे प्रयत्न निष्फळ ठरतील अशी चिंता व्यक्त होत आहे.
युक्रेनचा रशियाच्या सीमेला लागून असलेला भाग गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून युक्रेन सैन्याच्या ताब्यात होता. त्यासाठी पुतीन यांनी अचानक या भागाचा दौरा केला. यावेळी पुतीन यांनी दिलेल्या संदेशानंतर रशियाच्या लष्कराने कुर्स्क भागातील सुडशा हे मोठे शहर युक्रेनच्या ताब्यातून सोडवले. पुतीन यांनी येथील लष्करी सामग्री वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून येथील हल्ले अधिक तीव्र करण्यात आले आहेत. रशियाने एका बाजूला अमेरिकेच्या 30 दिवसांच्या युद्धबंदीला सहमती दर्शवताना हे हल्ले वाढवल्याने पुतीन यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे लक्षात येत नसल्याचा राजकीय निरीक्षकांचा कयास आहे. या भागाला ऐतिहासिक महत्त्व असून, दुसर्या महायुद्धाच्या काळात 1943 साली झालेल्या कुर्स्कची लढाई विशेष गाजली होती. सध्याच्या काळात हा भाग रशियाच्या विविध निर्मिती प्रकल्पांचा भाग आहे.