पुणे – सुरुवातीपासून जोरदार चर्चेत राहिलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित नव नव्या घडामोडी रोज समोर येत आहेत.अर्ज भरणाऱ्या महिलांना सरकरट योजनेच पैसे दिल्यानंतर सरकारने आता लाभार्थ्यांची छाननी सुरू केल्याने निकषात न बसणाऱ्या महिलांची तारांबळ उडाली आहे.काही महिला स्वतःहून आपल्याला मिळालेले पैसे सरकारला परत करू पहात आहेत. पुणे जिल्हा यामध्ये आघाडीवर आहे.पुण्यातील सुमारे ७५ हजार महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शविली आहे,असे वृत्त आहे.
लाडकी बहीण योजनेत बरेच गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच सरकारने लाभार्थ्यांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे योजनेच्या निकषात बसत नसताना लाभ घेणाऱ्या महिलांची घाबरगुंडी उडाली. अपात्र असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर कारवाई केली जाईल, पैसे वसूल केले जातील,अशा अफवा पसरल्या. त्यावर महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र महिलांचे पैसे परत घेणार नाही. तर यापुढे त्यांना योजनेचे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार नाही,असे वारंवार सांगितले.तरीदेखील या महिला स्वतःहून पैसे परत करण्यास तयार झाल्या आहेत. महिला आणि बाल विकास खात्याने त्यासाठी आता स्वतंत्र बँक खाते उपलब्ध करून दिले आहे. या खात्यामध्ये महिलांना पैसे भरायचे आहेत.
पुण्यापाठोपाठ कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही पैसे परत करू इच्छिणाऱ्या महिलांची मोठी संख्या आहे,असे सांगितले जाते. या जिल्ह्यांतील महिलांचा नेमका आकडा मात्र उपलब्ध झाला नाही.