पुणे – पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांची संख्या १५ वर पोहचली आहे. झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिलांना आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुणे महानगर पालिकेकडून करण्यात आले आहे.
पुणे शहरातील झिकाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. झिकाची लागण झाल्याचा संशय असलेल्या अनेकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. पुणे शहरात झिकाचे नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. झिकाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गर्भवती महिला आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत झिकाचे जे रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. याची दाखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ३१ गर्भवती महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप आलेला नाही. अहवाल आल्यावर किती गर्भवतींना झिकाची लागण झाली हे स्पष्ट होणार आहे.