पुणे – पुण्याच्या रस्त्यांवरील खड्डे हे गेले काही दिवस चर्चेचा विषय बनले आहेत. कालच समाधान चौक परिसरात मोठा खड्डा पडून महापालिकेचा ट्रक त्यात कोसळल्याची घटना घडली होती. या खड्ड्यांवरून राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच पुणे दौर्यात खराब रस्त्यांमुळे त्रासलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून या खड्ड्यांची तक्रार केली आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी त्यांनी केल्याने खळबळ उडाली असून, खड्ड्यांबाबत थेट राष्ट्रपती दर्जाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीमुळे पुणे महापालिकेची लाज पुरती गेली आहे.
2 आणि 3 सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे दौर्यावर आल्या होत्या. पुण्यातील राजभवन येथे त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाताना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. व्हीव्हीआयपींच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावरही बरेच खड्डे असल्याने राष्ट्रपती वैतागल्या. त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना खरमरीत पत्र पाठवून याबद्दलची नाराजी कळवली. या रस्त्यांची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राची दखल घेऊन 26-27 सप्टेंबरच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौर्याच्या आधी तरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. पंतप्रधानांच्या येण्याजाण्याच्या व्हीव्हीआयपी मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करण्याबरोबरच रोडवरचा राडारोडा काढावा आणि रस्ता सुस्थितीत करून घ्यावा, मेट्रोचे काम चालू असलेल्या ठिकाणीही रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी विनंती पुणे पोलिसांनी या पत्रात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा दोन दिवसांचा आहे. या दौर्यामध्ये 26 सप्टेंबरला ते शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोचे भूमिपूजनदेखील त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सहभागी होतील. 26 तारखेला ते पुणे मुक्कामी राहणार आहेत. दुसर्या दिवशी मोदी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी बारा ते अडीच वाजेपर्यंत अशी या कार्यक्रमाची वेळ आहे. सायंकाळी सुमारास मोदी तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकी येथील विकसित भारतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोदींचा हा पुणे दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौर्यात खड्ड्यांचे विघ्न नको, याची काळजी आता प्रशासन
घेत आहे.
सध्या पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामांमुळे खड्डे पडत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळे हे खड्डे महापालिकेने बुजवायचे की मेट्रो प्रशासनाने यावरून दोन यंत्रणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. या दोन्ही संस्थांच्या भांडणात रस्त्यावरील खड्डे बुजवलेच जात नसल्याने नागरिकांना फटका बसत आहे. राष्ट्रपतींच्या पत्रानंतर व्हीव्हीआयपींना असा अनुभव, तर आपले काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.