महाड- महायुती सरकारच्या पालकमंत्रिपदाची यादी काल जाहीर झाली. बीडमधील परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि महाडचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिंदे गट नाराज झाला असून, महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आली आहे. नाराज झाल्यावर नेहमी आपल्या दरे गावी जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर आज पुन्हा दरेला निघून गेले.
भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद यावेळीही दिले नाही. त्यांना पुन्हा डावलल्यामुळे रायगडमधील त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महिला व बाल कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यात रस्सीखेच होती. गेल्या वेळी महायुतीच्या सरकारमध्ये पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांच्या वाट्याला आले होते. त्यामुळे भरत गोगावले नाराज होते. यावेळी पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळेल असे भरत गोगावले सांगत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आदिती तटकरे यांच्या नावाला कौल दिला. त्यामुळे रायगडमधील गोगावले समर्थक आक्रमक झाले. तटकरे समर्थकांकडून जल्लोष केला जात असतानाच गोगावले समर्थकांनी आंदोलन केले. काल रात्री त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग दोन तास रोखला. महाड तालुक्यातील नांगलवाडी हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शने केली. अग्निशमन दलाला पाचारण करून टायरची आग विझवण्यात आली. गोगावले समर्थकांनी यावेळी तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला. गोगावलेच पालकमंत्रिपदी हवेत अशाही घोषणा दिल्या गेल्या. पालकमंत्रिपद न दिल्याने शिंदे यांच्या शिवसेनेच्या 38 गोगावले समर्थक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. त्यात संपर्कप्रमुख अरुण चाळके, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा समावेश आहे.
पालकमंत्रिपदावरून डावलल्याबद्दल प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले की, रायगडच्या पालकमंत्रिपदासंदर्भातील निर्णय धक्कादायक आहे. ही अपेक्षा अजिबात नव्हती. रायगडमधील सहा आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यात याबाबत काय वातावरण आहे, याची माहिती दिली होती. आता जो निकाल आहे तो अनपेक्षित आहे आणि मनाला पटणारा नाही. परंतु आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पालकमंत्रिपद मिळाले नाही, म्हणून डगमगणार नाही. कोणीही भडकाऊ भाषण करू नका. ज्यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, ईश्वर के घर देर हे अंधेर नहीं ।
शिंदे गटाचेच गुलाबराव पाटील म्हणाले की, दादा भुसे व भरत गोगावले यांना नक्कीच पालकमंत्रिपद मिळायला पाहिजे होते. तशी आमची इच्छा होती. त्यांच्यावर निश्चितच अन्याय झाला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादावर खासदार सुनील तटकरे म्हणाले की, ज्यावेळी तीन पक्षांचे सरकार असते त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक मंत्र्याला त्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळेलच असे होऊ शकत नाही. याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्र निर्णय घेतला. सर्वांचे समाधान होईल असे शक्य नाही. नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर सर्वांनी राखला पाहिजे.
उपमुख्यमंत्री शिंदे
पुन्हा दरे गावी गेले
महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर होताच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या महाबळेश्वरजवळील दरे या मूळ गावात पोहोचले. त्यामुळे पालकमंत्री वाटपावरून ते नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज झाले की, शिंदे आपल्या दरे गावी जातात, असे यापूर्वीही अनेकदा घडले आहे. यापूर्वी ते खातेवाटपावरून दिल्लीहून थेट दरे गावात गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील अनेक नेते त्यांच्या भेटीसाठी दरे गावात गेले होते. मात्र आधी शिंदेंनी भेट न देता या नेत्यांना माघारी पाठवले होते. त्यानंतर त्यांनी काही नेत्यांशी चर्चा केली होती.