पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका फातिमा शेख हे काल्पनिक पात्र आहे. फुले यांच्या चरित्रग्रंथात कुठेही त्यांचा उल्लेख नाही. ते आपणच जन्माला घातलेले पात्र आहे, असा खळबळजनक दावा केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी फातिमा शेख यांच्या जयंतीदिनीच आज केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
दिलीप मंडल हे प्राध्यापक आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांत अनेक वर्षे पत्रकार म्हणूनही काम केले आहे. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले असून, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी संघ-भाजपा आणि हिंदुत्वावर अनेकदा कठोर टीका केलेली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नेमणूक झाली आहे. 2019-20 मध्ये त्यांनी काही लेख लिहिले होते. त्यामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केला होता. सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांना फातिमा शेख यांनी शाळा चालवण्यामध्ये सहकार्य केले, असा उल्लेख त्यांनी आपल्या लेखात वारंवार केला होता. आता चार वर्षांनंतर या आपल्याच लेखाबद्दल दिलीप मंडल यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, मी एक मिथक किंवा काल्पनिक पात्र तयार केले आणि त्याला फातिमा शेख असे नाव दिले. मला माफ करा. पण फातिमा शेख नामक स्त्री कधीच अस्तित्वात नव्हती. ती ऐतिहासिक किंवा खरी व्यक्ती नाही हे सत्य आहे. ही माझी चूक आहे. एका विशिष्ट कालखंडासाठी मी हे नाव तयार केले. मी हे जाणूनबुजून केले. त्यापूर्वी या पात्राचा गुगलवर कुठेही उल्लेख नव्हता. फातिमाविषयी एकही लेख नाही, पुस्तकही नाही. काहीच नाही.
2022 मध्ये मी फातिमा शेख यांच्या कथेपासून दूर गेलो, तशी माझी त्यांच्याविषयीची रुची संपली. त्यानंतर हे पात्र सोशल मीडियावर आले आणि लगेच गायब झाले. मी हे का केले, ते विचारू नका. ती वेळ व परिस्थिती तशी होती. एका उद्देशासाठी एक पात्र तयार करण्याची गरज होती म्हणून मी ते केले. हजारो लोकांकडून याला दुजोरा मिळू शकेल. त्यांच्यापैकी बहुतेकांनी हे नाव माझ्याकडून पहिल्यांदा ऐकले. मला एखादी कथा तयार करण्याची, प्रतिमा तयार करण्याची कला अवगत आहे. मी या कलेत प्राविण्य मिळवले आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी कठीण नव्हते. जुनी छायाचित्रे नसल्यामु्ळे एक काल्पनिक रेखाचित्र तयार केले. मी तिच्याविषयी अनेक गोष्टी पसरवल्या आणि अशा प्रकारे फातिमा शेख अस्तित्वात आली. त्यानंतर ही कथा सर्वत्र पसरली. या कथनाची ज्यांना राजकीय व वैचारिक हेतूसाठी गरज होती त्यांनी त्यात आणखी भर घातली.
ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण लिखाण प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांच्यासोबत शिकवणार्या फातिमा शेख या नावाचा कुठेही उल्लेख नाही. बाबासाहेब आंबेडकरांनीही हे नाव कधी घेतलेले नाही. 15 वर्षांपूर्वीपर्यंत कोणत्याही मुस्लीम विद्वानाने या नावाचा उल्लेख केलेला नाही. फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक प्रयत्नांचा उल्लेख असणार्या ब्रिटिश दस्तावेजांतही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही. त्यांचे नाव कुठेच सापडत नाही. पुरावा मिळवण्यासाठी माझे जुने ट्विट, फेसबूक पोस्ट, लेख किंवा व्हिडिओ धुंडाळणे टाळा. मी स्वतः फातिमा शेख यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पण ती कधीच अस्तित्वात नव्हती हे मी कबुल करतो, असे दिलीप मंडल यांनी आपल्या विस्तृत पोस्टमध्ये म्हटले आहे.
फातिमा शेख यांना भारताच्या पहिल्या मुस्लीम शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारतातील स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणांत महत्त्वाचे योगदान दिले, असेही सांगितले जाते. फातिमा शेख यांच्या जन्म 9 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील होते. नंतर ते पुण्याला आले. त्या मिया उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या. उस्मान यांच्याच घरातच महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे वास्तव्य होते असे मानले जाते. सल्लागार या मोठ्या पदावर असलेल्या दिलीप मंडल यांच्या आताच्या वक्तव्याने अनेकांना धक्का बसणार आहे. कारण महात्मा फुलेंवरील अनेक पुस्तकांत फातिमा यांचा उल्लेख आहे. य. दि. फडके यांच्या संपादित केलेल्या फुले गौरव ग्रंथात त्यांचा उल्लेख आहे. फातिमा शेख यांनी नगरच्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिकवण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. महात्मा फुले यांच्या शाळेत त्यांनी शिक्षिका म्हणून काम केले आहे, असा उल्लेख त्यात आहे. शर्मिला रेगे यांनी सावित्रीबाई फुलेंवर लिहिलेल्या लिखाणामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख आहे. वाद निर्माण केल्याबद्दल मंडल यांना ताबडतोब पदावरून काढले पाहिजे.
याबाबत प्रतिक्रिया देताना जेएनयुचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड म्हणाले की महात्मा फुले यांचा गौरव ग्रंथ य.दि.फडके यांनी संपादित केलेला गौरव ग्रंथ साधारण 30-35 वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. त्यामध्ये फातिमा शेख, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचे उल्लेख आहेत. मात्र, फातिमा शेख यांचा फोटो उपलब्ध नाही. मात्र, इतिहासात त्यांचा उल्लेख आहे. हे पात्र इतिहासात हयात आहे. अस्तित्वात आहे. महाराष्ट्रात साधारणता 1980 पासून प्रतिमा शेख यांच्यावर चर्चा होत आहे. परिसंवाद होत आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कामात त्यांचा सहभाग आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मंडल त्यांचा दावा कोणत्या आधारावर करत आहेत. त्यांना विचारायला हवे. पण, हा एक मोठे वैचारिक गोंधळ करण्याचे हे षडयंत्र आहे.
सत्यशोधक चळवळीच्या प्रतिमा परदेशी यांनीही मंडल यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, मंडल यांनी फातिमा शेख यांच्याविषयी केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे. केंद्रात मोठी खुर्ची मिळाली म्हणून त्यांनी असे विधान केले असावे. फातिमा शेख यांच्याबद्दल इतिहासात अनेक पुरावे आहेत. तरीही अशी विधाने करून मंडल समाजात द्वेश पसरवत आहेत.