मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ९६० लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दहा दिवसांत कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम केले जात आहे. मालाड स्थानकाच्या पूर्वेला सहाव्या मार्गिकेसाठी जागा नसल्याने पश्चिमेला सहावी मार्गिका उभारण्यात येत आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवर ३५ दिवस १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. पहिला ब्लॉक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर, दुसरा ब्लॉक ७ आणि ८ सप्टेंबर, तिसरा ब्लॉक २१ आणि २२ सप्टेंबर, चौथा ब्लॉक २८ आणि २९ सप्टेंबरला तर पाचवा ब्लॉक ५ आणि ६ ऑक्टोबरला घेण्यात आला आहे. पहिल्या तीन ब्लॉक दरम्यान दरदिवशी १५० लोकल फेऱ्या रद्द असतील. चौथ्या ब्लॉक दरम्यान १८० तर पाचव्या ब्लॉक दरम्यान १०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक काळात वेगमर्यादेमुळे मेल-एक्स्प्रेस १५ ते २० मिनिटांसाठी विविध स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर गोरेगाव ते कांदिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवर यांत्रिक काम हाती घेण्यात येईल. यामुळे वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या गाड्या ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावतील. गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवरील रेल्वेचा भार कमी होईल.