पनवेल, शहापुरात पावसाचा कहर रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई – नवी मुंबईसह ठाणे, पनवेल, कळंबोली, शहापूर परिसरात आज पावसाने कहर केला. मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच साठले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने नाशिक, कोकण तसेच कल्याण कसारा दरम्यानच्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
रात्रीपासून शहापूर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहापूरमधील भारंगी नदीला पूर आल्याने गुजरातीबाग, चिंतामणनगर, ताडोबा परिसर आणि गुजरातीनगर या परिसरामधील घरांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका लोकलला देखील
बसला आहे. आडगाव तानसेत दरम्यान रेल्वे ट्रॅकवर माती आणि दगड आल्याने कसाराकडे जाणार्‍या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. आसनगाव येथील पूल पहिल्या पावसात वाहून गेला. मुंबई-नाशिक महामार्गावर पाणी साचले. पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढावा लागला. रहिवाशांनी मुंबई-नाशिक मार्गावर रास्ता
रोको केला.
नवी मुंबईसह पनवेलमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले. पनवेलमधील काढू, काळुंद्री नदीचे पाणी आदई, सुकापूर भागात सोसायटी, घरात घुसले. इमारती खाली उभ्या करण्यात आलेल्या गाड्या साठलेल्या पाण्यात अर्ध्या बुडाल्या. सोसायटीतील रहिवाशांना घराबाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. कमरेपर्यंत पाणी साचले आहे. कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले. रबाळे एमआयडीसी येथे एका डोंगराचा भाग कोसळला. येथील नागरिकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. कोकणात सिंधुदुर्गात आंबेरी, निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला.

सिंधुदुर्गात ढगफुटी
सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश पाऊस झाला. ओरोस जवळ पाणी साचल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. निर्मला आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेवरील आटगाव वाशिंद दरम्यान ट्रॅकवर झाड पडल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. तर दुसरीकडे खडवली स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवरील खडी व माती वाहून गेली. त्यामुळे कसार्‍यावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणार्‍या गाड्या पूर्णपणे विस्कळीत झाल्या. खडवली आणि टिटवाळा स्थानकादरम्यान अनेक एक्स्प्रेस व ट्रेन एकामागे एक उभ्या करण्यात आल्या. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या वसई-दिवा मार्गे वळवण्यात आल्या. नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा परिणाम कोकण रेल्वेवर झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top