कोल्हापूर- हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर आणि कन्या विद्या मंदिरच्या क्रीडा मैदानाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या मैदानामध्ये गेल्या काही वर्षापासून अनेक लोकांनी अतिक्रमण सुरू केले आहे.
या मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही ग्रामस्थांकडून तर या मैदानावर जेसीबीने खड्डे खणले आहेत, तर मैदानाची अवस्था उकिरड्यासारखी झाली आहे. अतिक्रमणांमुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आणि शारीरिक विकासासाठी आता पर्यायी मैदानाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मैदानातील घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे.तसेच या विद्यार्थ्यांना याच घाणीतून ये-जा करावी लागत आहे. काही सामाजिक संघटनांनी हे मैदान स्वच्छ करण्याचे प्रयत्न केले. तरीही काही लोक या मैदानाचा उकीरड्यासारखा म्हणून वापर करत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर मैदान स्वच्छ करावे अशी मागणी होत आहे.