जळगाव – विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपून घरी परतणारे बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर दुचाकी अपघातात ठार झाले. ही घटना चोपडा येथे काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४८) असे या ठार झालेल्या बीएलओचे नाव आहे.ते चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे शिक्षक आणि बीएलओ म्हणून कार्यरत होते. काल रात्री ते चोपडा येथून शिरपूर तालुक्यातील बभळाज या आपल्या मूळ गावी दुचाकीने जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आज गुरुवारी सकाळी बभळाज या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.