नितीशकुमारांचा मणिपुरात गोंधळ! भाजपाचा पाठिंबा काढून पुन्हा दिला

इम्फाळ- बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे (जदयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी आज मणिपूरमध्ये भाजपाला धक्का दिला. भाजपाच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा नितीशकुमार यांनी काढून घेतला. बिहारची विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत असलेल्या नितीशकुमार यांनी भाजपाला धक्का दिला. त्यांच्या पक्षाचे मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सिंह यांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले. यामुळे खळबळ माजलेली असतानाच नितीशकुमार यांनी गोंधळ घालत प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सिंह यांनाच पदावरून मुक्त करून भाजपा सरकारला पाठिंबा कायम असल्याचे जाहीर केले. मणिपूरमध्ये भाजपाला पुन्हा पाठिंबा दिला असला तरी या संपूर्ण घडामोडींमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार भाजपाची युती तोडतात का? अशी चर्चा रंगली आहे.
मणिपूरमध्ये 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूचे सहा उमेदवार निवडून आले होते. मात्र निवडणुकीनंतर काही महिन्यांतच त्यापैकी पाच आमदारांनी जदयूला राम राम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत भाजपाची स्थिती मजबूत झाली. या निवडणुकीत भाजपाचे 37 उमेदवार विजयी झाले. भाजपाला नागा पीपल्स फ्रंटचे पाच आणि तीन अपक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपाला बहुमताचा आकडा सहज गाठता आला. तर दुसरीकडे पाच आमदारांनी पक्षांतर केल्याने जदयूकडे एकमेव आमदार शिल्लक राहिला आहे.
आज जदयूचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सिंह यांनी राज्यपालांना अधिकृत पत्र लिहून एन विरेंद्र सिंह सरकारचा पाठिंबा मागे घेत असल्याचे कळवले. आपले एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासीर हे यापुढे विरोधी सदस्य मानले जावे, अशी विनंती केली. भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा का काढून घेतला याचे स्पष्टीकरण
नितीशकुमार यांनी लगेच दिले नाही. जदयूने पाठिंबा काढून घेतल्याने खळबळ माजलेली असताना नितीशकुमार यांनी पुन्हा पलटी मारली. त्यांनी आपला हा निर्णयही तासाभरात मागे घेतला. आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सिंह यांना प्रदेशाध्यक्षपदावरूनच हटविले. भाजपा सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि विरेंद्र सिंह यांच्यावर पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला.
जदयूने पाठिंबा काढून घेतला तरी मणिपूरमधील भाजपा सरकारला धोका नव्हता. कारण भाजपाकडे अजूनही पूर्ण बहुमत आहे. याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) कुकी आणि मैतेर्इंमधील वाढत्या हिंसाचाराच्या मुद्यावरून भाजपा सरकारचा पाठिंबा
काढून घेतला आहे.
नितीशकुमार यांच्या बदलत्या भुमिकेमुळे भाजपा आणि नितीशकुमार यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. मात्र भाजपाला केंद्रात जदयू आणि तेलगू देसम पक्षांनी पाठिंबा दिल्याने मोदी सरकार सत्तेवर येऊ शकले. या दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जदयूचे 12 खासदार विजयी झाले आहेत. त्यांचा पाठिंबा भाजपासाठी महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहार विधानसभेच्या निवडणुका याच वर्षी होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांनी मणिपूरमध्ये घेतलेल्या या भूमिकेकडे भाजपाला सावधपणे पाहावे लागणार आहे. कारण नितीशकुमार यांचा दलबदलूपणाचा
पूर्वेतिहास पाहता बिहार निवडणुकीच्या ऐन तोंडावर नितीशकुमार बिहार राज्यात भाजपाला धक्का देतील याची टांगती तलवार भाजपावर आहे.
सन 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या जदयूला 43 जागा तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. कमी जागा असूनही भाजपाने नितीशकुमार यांचा पाठिंबा मिळावा यासाठी मुख्यमंत्रिपद दिले आहे. तर दुसरीकडे नितीशकुमार यांनी साथ सोडून दिलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) 75 आमदार आहेत. राजद पुन्हा नितीशकुमार यांना पाठिंबा देण्यास उत्सुक आहे. त्यामुळे येथे भाजपाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. राजकारणात पलटूराम अशी उपाधी लाभलेले
नितीशकुमार ऐनवेळी भाजपाचा हात सोडून राजदला जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी मणिपूरमध्ये भाजपासोबत खेळलेल्या डावाची बिहारमध्ये पुनरावृत्ती होणारच नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top