नागपूर – नागपुर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुकांच्या रविभवन येथे मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी एकही जागा सोडणार नसल्याचे चित्र दिसत आहे. नागपूरच्या सहाही जागा काँग्रेस लढणार असल्याचा दावाच काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.
विकास ठाकरे म्हणाले की, शहरातील ६ ही विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंत ७१ इच्छुक उमेदवारांनी शहर काँग्रेसकडे उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. यात सर्वाधिक ३० अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी आले आहेत.नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्यासाठीदेखील काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले होते. तर राज्यासह विदर्भात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस मोठ्या मताधिक्याने सर्वच्या सर्व जागांवर विजय संपादन करेल.