नांदेड – नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे यकृताच्या आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.काल मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या अकाली निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंत चव्हाण नांदेड मतदारसंघातून विजयी झाले होते.नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे नांदेडमधील राजकीय समीकरणे बदलली होती. मात्र असे असतानाही चव्हाण यांनी भाजपा उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करून भाजपाला मोठा धक्का दिला होता.
वसंत चव्हाण यांना यकृताचा आजार जडला होता. मागील काही आठवडे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.त्यामुळे त्यांना काही दिवस उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.काल मध्यरात्री प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने हैदराबादच्या किंग्ज रुग्णालयात हलविण्यात आले होते.त्यांच्या पार्थिवावर उद्या नांदेडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चव्हाण संपूर्ण आय़ुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले.त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब या भावनेने त्यांनी पक्षाचे काम केले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, वसंत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा मुलभूत विचार घरोघरी पोहोचवला.अत्यंत जड अंतःकरणाने मी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतो. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण काँग्रेस पक्ष चव्हाण कुटुंबियांच्या सोबत आहे.