मुंबई- राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपणार असून राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या काहींना लोकसभेत उमेदवारी नाकारण्यात आली होती, त्यांच्यापैकीच कुणाची तरी राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे .
जुलै २०१९ मध्ये बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती झाली. येत्या २८ जुलैला त्यांची राज्यपालपदाची मुदत संपुष्टात येत आहे. राज्यपालांची मुदत ही पाच वर्षांची असली तरी राष्ट्रपतींची संमती असेपर्यंत ते या पदावर कायम राहू शकतात. मोदी सरकार सत्तेत आल्यावर २०१४ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या राज्यपालांची पाच वर्षांची मुदत संपल्यावर कोणालाच मुदतवाढ देण्यात आली नव्हती. पाच वर्षांनंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे राज्यपालांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे.