प्रयागराज- भाजपा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला पोहचला होता. प्रयागराजवरून विमानाने तो दुसरीकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याला अटक झाली. भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आणि त्यावरून लोकेशन ट्रॅक करून त्याला बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घेऊन त्याला उद्या बीडमध्ये आणले जाणार आहे. भोसलेच्या वकिलाने काल बीड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे जामीन अर्ज वकिलाने मागे घेतला आहे. पुन्हा नव्याने अर्ज केला जाणार असल्याची माहिती खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांनी दिली आहे.
दीड वर्षा आधी खोक्याने बुलडाण्यातील कैलास वाघला मारहाण केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या मारहाणीचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. 19 फेब्रुवारीला दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना मारहाण केली. या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून सतीश भोसले फरार होता. त्याने दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलखात देत निर्दोष असल्याचा दावा केला होता. त्यानंतरही पोलिसांना तो सापडला नव्हता. खोक्या भाईचे अनेक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. सतीश भोसलेनने 200 हून अधिक काळवीट, ससा, मोर, हरीण ठार मारले आहे असा आरोप वन्यजीव प्रेमी माऊली शिरसाट यांनी केला. त्यानुसार वनविभागा आणि पोलिसांनी भोसले घरात छापा टाकला होता. काही शस्त्र, शिकारीचे जाळे, वन्य प्राण्यांचे मास, गांजाची दोन पाकिटे पोलिसांनी जप्त केली . त्याने वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केले होते. या प्रकरणात एन. डी. पी. एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सात दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, सतीश भोसलेला अटक करण्यात आली आहे ही चांगली बाब आहे. त्याने जी चूक केली आहे त्या संदर्भात त्याला अटक झाली आहे. कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली जाईल. विरोधकांनी माझ्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. मी कोणत्याही पोलिसाला फोन केला नाही. मी सुरुवातीपासूनच त्याला अटक करा असे म्हटले आहे. त्याने चूक केली असेल तर त्याच्या कारवाई करा.
धसांच्या खोक्याला प्रयागराजमधून अटक
