मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पुरेसा पाऊस पडत नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाणीसाठा कमी झाला होता. धरणात पाणी नसल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता वाढली होती. मात्र गेले दोन दिवस धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात २०.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत मुंबईकरांच्या पाणीसाठ्याची चिंता मिटली आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ७५० दशलक्ष लिटर तर वर्षभरात १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. गेले दोन दिवस चांगला पाऊस पडल्याने धरणांमध्ये २ लाख ९६ हजार ३४८ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. वर्षभर लागणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात हा पाणीसाठा २०.४८ टक्के आहे. मात्र, गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा कमी आहे.
मोडक सागर धरणात ३७.७२ टक्के पाणीसाठा आहे. तर तानसा धरणात ४३.१६ टक्के पाणीसाठा आहे. मध्य वैतरणा धरणात २०.३७ टक्के पाणीसाठा तर भातसा धरणात १८.२१ टक्के पाणीसाठा वाढला. विहार धरणात ३८.७५ टक्के पाणीसाठा तर तुळशी धरणात ५४.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईतील पवई तलावदेखील काल ओव्हरफ्लो झाला. या धरणातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरला जातो.