धनंजय मुंडे यांच्या अडचणी अधिकच वाढल्या! करुणाच पहिली पत्नी! 2 लाख पोटगी द्यावी लागेल

मुंबई- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, वाल्मिक कराड याचा या हत्येशी संबंध असल्याचा संशय, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक, कृषि मंत्री असताना धनंजय मुंडेंनी केलेली वाढीव रकमेची खरेदी, मंत्रिपदावर असताना कंपनीच्या पदावर राहून घेतलेला आर्थिक लाभ या एकामागे एक झालेल्या आरोपांमुळे अडचणीत असलेले धनंजय मुंडे यांच्यावर आज आणखी मोठे संकट कोसळले. त्यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे यांचा दावा आज वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने मान्य करून करुणा मुंडे यांना महिना दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. यामुळे खळबळ माजली असून, धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा आतातरी घ्यावा, असा दबाव निर्माण झाला आहे.
करुणा मुंडे यांनी 2020 साली वांद्रे कौटुंबिक न्यायालयात धनंजय मुंडे यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार आणि पोटगी यासाठी अर्ज केला. त्यांचा हा खटला बीडचे वकील ॲड. गणेश कोल्हे यांनी मोफत चालविला, असे करुणा मुंडे यांनी सांगितले. आज या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने करुणा मुंडे यांनी केलेले दावे अंशतः मान्य असल्याचे म्हणत त्यांना महिना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश धनंजय मुंडे यांना दिला. त्याचबरोबर या खटल्याचा खर्च म्हणून 25 हजार रुपये देण्याचाही आदेश धनंजय मुंडे यांना देण्यात आला. हा न्याय मिळाल्यानंतरही करुणा मुंडे यांनी सांगितले की, मी व माझी दोन मुले यांच्यासाठी महिना 15 लाखांची पोटगी मिळावी असा मी अर्ज केला होता. यासाठी आता मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
करुणा मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले होते की, 9 जानेवारी 1998 या दिवशी माझे व धनंजय मुंडे यांचा इंदूर येथे विवाह झाला. आम्हाला सीशिव व शिवानी ही दोन मुले आहेत. सुरुवातीला इंदूर येथेच राहायची. त्यानंतर आम्ही मुंबईत राहायला आलो. मात्र पुढे धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडे यांच्याशी विवाह केल्याचे मला कळले. मी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आपला आंतरजातीय विवाह आहे. मला आमच्या समाजासाठी जातीतील मुलीशी लग्न करावे लागले. माझ्या कुटुंबाचाही यासाठी दबाव होता. पण मी तुला पहिल्या पत्नीचा मान देईन. धनंजय यांनी हे आश्वासन दिल्याने मी तक्रार केली नाही. 2017 साली धनंजय मुंडे यांनी इच्छापत्र तयार केले, ज्यात करुणा मुंडे पहिली पत्नी आणि राजश्री मुंडे दुसरी पत्नी असा उल्लेख आहे. या काळापर्यंत सर्व सुरळीत चालले होते. 2018 नंतर मात्र ते माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले. तेव्हा मी बीडला जाऊन राहण्याचा हट्ट धरला. मात्र तू बीडला आलीस तर माझी राजकीय कारकीर्द संपेल असे म्हणून त्यांनी मला बीड येण्यास मज्जाव केला. मला धमकावले, माझ्या बहिणीचा व आईचा शारीरीक छळ केला. तरीही 2020 साली नोव्हेंबर महिन्यात मी बीडला निघाले. तेव्हाही मला
धमकाविण्यात आले. माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. माझ्या गाडीत पिस्तुल ठेवून त्या आरोपाखाली मला आधी बीड जेलमध्ये आणि नंतर येरवडा जेलमध्ये अनेक महिने डांबून ठेवले. यामुळे मी अखेर कोर्टात जाण्याचा निश्चय केला. 2024 सालच्या निवडणुकीवेळी धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात सीशिव व शिवानी या दोन मुलांची जबाबदारी घेतल्याचे नमूद केले आहे.
करुणा मुंडे यांनी आज सर्व तपशिल देऊन आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत, असा दावा करीत पोटगी मागितली. धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोपही केला.
या खटल्याच्या सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे हिच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला. सीशिव व शिवानी ही दोन मुले सज्ञान असल्याने कायदानुसार त्यांना आर्थिक मदत देण्याची जबाबदारी नाही असाही युक्तिवाद केला. करुणा मुंडे या तीन कंपन्यांमध्ये संचालक आहेत. त्या विमा एजंट आहेत आणि त्या त्यांची जागा भाड्याने देऊन त्याचे भाडेही घेत असल्याने त्यांना पोटगी देण्याची गरज नाही, असेही धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मांडले होते. मात्र आज न्यायालयाने करुणा मुंडे यांचे म्हणणे अंशतः मान्य करून त्यांना पोटगी देण्याचा आदेश धनंजय मुंडे यांना दिला.
या निकालामुळे खळबळ माजल्यानंतर करुणा मुंडे यांनी अनेक मुलाखती देऊन त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे आरोप केले. धनंजय मुंडे यांनीही निवेदन जारी करून म्हटले की, हा निकाल फक्त पोटगीपुरता आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या आरोपाबाबत अद्याप निकाल आलेला नाही. कौटुंबिक न्यायालयाने आज निकाल दिल्यानंतरही अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
आईच खोटे दावे करत आहे
मुलगा सीशीवची पोस्ट चर्चेत

करुणा मुंडे यांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर त्यांचा मुलगा सीशीव याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, मला काही बोलण्याची गरज वाटत आहे. कारण मीडियाने माझ्या कुटुंबाला मनोरंजन बनवले आहे. माझे वडील सर्वोत्तम नव्हते, पण त्यांनी आम्हाला कधीच हानी पोहोचवली नाही. मात्र, माझी आई वेगळी होती. तिला तिच्या समस्या होत्या आणि त्यांचा सर्वात वाईट प्रकारे सामना करण्याची पद्धत आम्हाला त्रास देणे ही होती. ती ज्या घरगुती हिंसेचा दावा करते, ती प्रत्यक्षात मी, माझी बहीण आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत घडत असे. माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर, तिने आम्हाला तिच्यापासून दूर जाऊन राहण्यास सांगितले. कारण तिला आमच्याशी काहीही देणे-घेणे नव्हते. 2020 पासून आमच्या वडिलांनी आमची जबाबदारी घेतली आहे. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक अडचणी नाहीत. तिने स्वतःहून घराचे कर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती माझ्या वडिलांविरुद्ध वैयक्तिक लढाई लढण्यासाठी खोट्या गोष्टी सांगत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top