पुणे- एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला.तर सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड गावाजवळ काल सोमवारी रात्री घडला.
या अपघातातील मृतांची नावे नामदेव बाबुराव आढाव आणि सुवर्णा संतोष होले अशी आहेत.हे दोघे बीड आणि दौंड येथील रहिवाशी होते.सोलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसचालकाकडून वरवंड गावाजवळ कवठाचा मळा येथे एका दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.ही बस दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूस गेल्याने समोरून येणार्या दुसऱ्या बसला धडक बसली.या अपघातात सोलापूरहून पुण्याकडे जाणारी जामखेड-स्वारगेट बस आणि पुण्याहून येणारी पुणे-तुळजापूर बस या दोन्ही बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाले. त्यातील दोन्ही बसचे चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून इतर तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.या अपघाताचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.