लखनौ- देशभरात आज धुळवड मोठ्या उत्साहात साजरी झाली. मात्र, धुळवडीच्याच दिवशी रमजान महिन्यातील शुक्रवार आल्याने उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत चिंतेचे वातावरण होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इशारा दिला होता की, होळीच्या रंगामुळे बेरंग होत असेल तर मशिदी झाकून ठेवा. त्यानुसार शहाजहानपूर ते संभल अशा अनेक शहरांत ताडपत्रींनी मशिदी झाकून ठेवण्यात आल्या. देशात पहिल्यांदाच मशिदी झाकण्यात आल्या. अखेर अत्यंत तणावाच्या वातावरणात आणि कडक पोलीस बंदोबस्तात या सर्व ठिकाणी धुळवड खेळली गेली आणि नमाजही अदा करण्यात आला.
64 वर्षांनंतर धुळवड व शुक्रवारचा नमाज एकाच दिवशी आला होता. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही राज्यांत विशेष दक्षता घेण्यात आली होती. उत्तर प्रदेशात 18 जिल्ह्यांत मशिदींबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. ड्रोनने मशिदींवर नजर ठेवण्यात येत होती. धक्कादायक बाब म्हणजे, होळीच्या रंगामुळे तणाव निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने मुस्लिमांना मशिदी झाकण्यास सांगितले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशातील 7 जिल्ह्यांमधील मशिदी, मदरसे आणि मकबरे ताडपत्रीने झाकण्यात आले होते. शहाजहानपूर येथे होळीच्या निमित्ताने लाटसाहेबाची मिरवणूक काढली जाते. यात ब्रिटिश अधिकार्याच्या रूपात लाटसाहेब तयार करून त्याला चप्पल-बुटांचा हार घालून रेड्याच्या गाडीवर बसवून फिरवले जाते. हा मिरवणूक मार्ग 8 किलोमीटरचा असून, त्यात लहानमोठ्या 64 मशिदी येतात. त्या मशिदींवर रंग टाकला गेला तर तणाव निर्माण होईल हे लक्षात घेऊन सर्व मशिदी ताडपत्री लावून झाकून ठेवण्यात आल्या होत्या. जातीय दंगलीमुळे संवेदनशील बनलेल्या संभलमध्ये होळीनिमित्त निघणार्या चौपैय्या मिरवणुकीच्या मार्गावर येणार्या जामा मशिदीसह सर्व 10 मशिदीही ताडपत्रीने झाकण्यात आल्या होत्या. याशिवाय अलीगढ, बरेली, बाराबंकी, अयोध्या व मुरादाबादमधील मशिदीही झाकून ठेवण्यात आल्या होत्या. प्रशासन आणि मुस्लीम समाज या दोघांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रशासनाने मुख्यमंत्री योगी यांच्या इशार्यानंतर तसे आवाहनच मशिदींना केले असल्याने मुस्लिमांनी सावध भूमिका घेतली.
होळीसाठी उत्तर प्रदेशात दुपारच्या नमाजची वेळही बदलण्यात आली. दुपारी 2 वाजता होणारा नमाज दुपारी अडीच वाजता झाला. नमाज वर्षभर असतो. पण होळी वर्षातून एकदाच येते. म्हणून आधी सकाळी 11 ते 2 धुळवड खेळली जाईल आणि नंतर 2.30 वाजता नमाज असा आदेश प्रशासनाने दिला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी धुळवड साजरी झाल्यावर नमाज पढण्यात आला. उत्तर प्रदेशातील देवबंदच्या उलेमांनी मुस्लीम नागरिकांना आपल्या घराजवळच नमाज अदा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अलीगढ मुस्लीम विद्यापीठात यावेळी पहिल्यांदाच धुळवड खेळण्यात आली.
मध्य प्रदेशातही काही ठिकाणी मशिदी झाकण्यात आल्या आणि नमाजाची वेळ बदलण्यात आली. होळीच्या रंगांबद्दल काही अडचण असेल तर मशिदी झाकाव्यात, असे प्रशासनाने मुस्लिमांना सांगितले होते. छत्तीसगढमध्येही नमाजच्या वेळेत बदल करण्यात आले.
दरम्यान, होळीच्या सणात मुस्लिमांना सहभागी होऊ न दिल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, हा मुस्लीम समाजाचा अपमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम या देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आताच हे विष कोण पेरत आहे? भाजपा आघाडीत सामील असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडनेही उत्तर प्रदेशमध्ये मशिदी झाकून ठेवण्याच्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. जदयूचे नेते अभिषेक झा यांनी म्हटले की, मशिदी झाकण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. भारत एक सेक्युलर देश आहे. सर्व जाती-धर्मांना आपले सण साजरे करायचा अधिकार आहे. अप्रिय घटना घडू नये याची जबाबदारी प्रशासनाची आहे.