नवी मुंबई – वाशी मार्केटमध्ये कोकणातून हापूस आंब्याच्या १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत ३२५ आंबा पेट्या आल्या असून, यापैकी ९५ टक्के देवगडमधील तर पाच टक्के रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. या आंबा पेट्यांना ७ हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.
थंडी, उष्मा, ढगाळ हवामान अशा एकूणच संमिश्र हवामानामुळे तुडतुडा, थ्रीप्स, कीडरोगांचा आंब्यावर प्रादुर्भाव झाला. ऑक्टोबरमध्ये आलेला मोहर व लगडलेली फळे वाचविण्यासाठी बागायतदारांना झाडावर ताडपत्री बांधावी लागली होती. बागायतदारांच्या प्रयत्नानंतर बचावलेला आंबा आता तयार झाल्याने विक्रेत्यांनी फळ काढणी सुरू केली आहे. मात्र, हे प्रमाण किरकोळ आहे . तयार झालेला आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल होत आहे .