नागपूर – नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत आंबेडकरी अनुयायांनी काल आंदोलन केले. या आंदोलकांनी पार्किंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी आज नागपूर पोलिसांनी १२५ पेक्षा अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यात वंचित बहुजन आघाडीशी संबंधित असलेल्या रवी शेंडे यांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.
आंदोलन, जाळपोळ केल्याप्रकरणी आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यातील १५ आंदोलकांची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुन्हा आंदोलनाचा भडका उडू नये यासाठी आरोपी आंदोलकांचे नावे पोलिसांकडून गुप्त ठेवण्यात आली आहे. यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त दीक्षाभूमी परिसरात तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या शाळांना काल आणि आज सुट्टी देण्यात आली आहे.