दिवाळीला बोनस मिळणार! लाडकी बहीण अफवांच्या घेऱ्यात

मुंबई – महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून निवडक लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. त्यामुळे महिला गोंधळात पडल्या आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. सरकारकडून दिवाळीनिमित्त आणखी अडीच हजार रुपये मिळणार असल्याचे वृत्त काही वृत्त संकेतस्थळांनी दिले. महिला या अडीच हजार रुपयांची वाट पाहत आहेत. हे पैसे कधी मिळणार याबाबत या वृत्तांमध्ये काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला वर्गांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधल्यावर असे स्पष्ट करण्यात आले आहे की, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. बोनसबाबतचे वृत्त खोटे असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचे अदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.तसेच, काही दिवासांपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचेही सांगितले जात होते . तेही वृत्त खोटे होते.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊन खातरजमा करून घ्यावी. अन्यथा महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top