जेजुरी- दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही लांब पल्ल्याची अति जलद रेल्वे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात अल्पवेळ थांबणार आहे. त्याचप्रमाणे सध्या कोल्हापूर ते पुणे धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून मुंबईपर्यंत धावणार आहे.
जेजुरी हे तीर्थक्षेत्र म्हणून लोकप्रिय आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा,राजस्थान,गुजरात येथून भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात येतात.या मार्गावरून वंदे भारत, दिल्ली-गोवा, जोधपूर-मंगळुरू,कोल्हापूर-अहमदाबाद,महालक्ष्मी,लोकमान्यनगर- हुबळी, यशवंतपूर-हुबळी अशा अनेक लांब पल्ल्याच्या अतिजलद रेल्वेगाड्या धावतात.मात्र,जेजुरीत थांबा नसल्याने भाविक व औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्गाची गैरसोय होते.गेल्या अनेक वर्षांपासून येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवाव्यात,अशी मागणी येथील लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते करत आहेत. अखेर रेल्वे प्रशासनाने मागणी मान्य करीत पुढील महिन्यापासून दिल्ली-गोवा एक्स्प्रेस जेजुरीत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.दुसरीकडे सध्या सुरू असलेली कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसही मुंबईपर्यंत धावणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.