नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी त्याचे अनुकरण करायला सुरुवात केली. दिल्ली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आपने महिला सम्मान योजना जाहीर केली आहे. आपपाठोपाठ आता काँग्रेसने आज महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्यारी दीदी योजनेची घोषणा केली. या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला २५०० रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
दिल्ली काँग्रेसचे प्रभारी काझी निजामुद्दीन म्हणाले की, दिल्लीत सत्तेत आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे. सामाजिक कल्याण आणि महिला सबलीकरणाशी संबंधित देशात पहिली योजना आम्हीच राबवली आहे. कर्नाटकात आम्ही ही योजना सुरू केली. या योजनेसह अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी तिथे केली आहे. दिल्लीतही महिला सक्षमीकरणाची गरज आहे. मला पुन्हा विश्वास आहे की, दिल्लीत आम्ही सरकार स्थापन करू.
दरम्यान,निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीनुसार दिल्लीत ७१ लाख महिला मतदार आहेत. याआधी आपने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. आपकडून लाभार्थी महिलांची नोंदणीही सुरु झाली आहे. त्यामुळे आता भाजपाही आपल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी एखादी योजना जाहीर करणार का, याची उत्सुकता आहे.