प्रयागराज- प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. यावेळी त्यांनी भगव्या रंगाचा स्वेटशर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पँट परिधान केली होती. त्यांच्या हातात आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी 10 वाजता प्रयागराजजवळील बमरौली विमानतळावर पोहोचल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते एमआय-17 हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर आले. तिथून ते अरैल घाटावर पोहोचले. या घाटावरून बोटीने ते संगम नोज येथे गेले. यावेळी मोदींसोबत मुख्यमंत्री योगीदेखील होते. ते मोदींना माहिती देत होते. यावेळी संगमाच्या काठावर उभ्या असलेल्या भाविकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. संगम नोज येथे पोहोचल्यानंतर सकाळी 11 वाजता मोदी यांनी पवित्र त्रिवेणीत स्नान केले. पंतप्रधानांनी सूर्याला अर्घ्य अर्पण करून सुमारे 5 मिनिटे मंत्रांचा जप करत पूजा केली. यावेळी ते एकटेच पुढे उभे होते . मुख्यमंत्री योगी मागे थांबले होते . संगम स्नानानंतर पंतप्रधान मोदी यांनी विधिवत गंगापूजन केले. त्यावेळी त्यांनी काळे जॅकेट, भगवे उपरणे आणि हिमाचली लोकरीची टोपी घातली होती. त्यानंतर त्यांनी साधू-संतांशी संवाद साधला.पंतप्रधान मोदी महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. संगम परिसरात निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते.
मोदी प्रयागराजमध्ये सुमारे दोन तास राहिले. ते कोणालाही भेटले नाहीत. संगमात स्नान व पूजा केल्यानंतर ते बोटीने अरैलच्या व्हीआयपी घाटावर पोहोचले. तिथून त्यांचा ताफा डीपीएस हेलीपॅडला पोहोचला. तिथून हेलिकॉप्टरने बामरौलीला पोहोचल्यावर हवाई दलाच्या विमानाने ते दिल्लीला परतले.
संगममध्ये स्नान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, आज महाकुंभातील पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा करण्याचे परमभाग्य लाभले. गंगा मातेचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला अपार शांती आणि समाधान मिळाले. तिच्याकडे सर्व देशवासीयांच्या आनंद, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. महाकुंभातील श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम सर्वांनाच भारावून टाकतो.
त्रिवेणी संगमावरील आपल्या स्नानाचे काही फोटोही मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये शेअर केले.
त्रिवेणी संगमावर मोदी यांचे कुंभस्नान
![](https://navakal.in/wp-content/uploads/2025/02/d72d3151-5e49-4a57-8f7e-4fb5086bc7b2-1-562x1024.jpg)