प्रयागराज – आग्र्यामधील एका तेरा वर्षाच्या मुलीला साध्वी बनवणारा महंत कौशल गिरी याची जुन्या आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या मुलीलाही आग्रा येथील तिच्या घरी परत पाठवण्यात आले आहे.
प्रयागराज येथे सध्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना उघडकीस आली आहे. स्वतः मातापित्यांनीच कन्यादान विधीने आपल्या पोटच्या मुलीला या साध्वी होण्यासाठी या महंताच्या हवाली केले होते. मुलीचे वडील संदीप सिंह ढाकरे व त्यांच्या पत्नी रीमा हे २६ डिसेंबर रोजी प्रयागराजमध्ये आले होते. त्यावेळी जुन्या आखाड्याचे महंत कौशल गिरी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यानंतरगेल्या सोमवारी त्यांनी पूजाअर्चा करुन आपल्या मुलीचे कन्यादान केले. महंताने तिचा साध्वी होण्यासाठी स्वीकार करत तिला गौरी असे नाव दिले. मुलीच्या आईने म्हटले आहे की, आम्ही गेल्या चार वर्षांपासून महंताचे भक्त आहोत.
या कन्यादान व साध्वी बनवण्याच्या विधीला जुना आखाड्याच्या सर्वसाधारण सभेत विरोध करण्यात आला. ‘रमता पंच’ने अशा प्रकारच्या कर्मकांडाला चुकीचे घोषित केले व महंताची ७ वर्षांसाठी आखाड्यातून हकालपट्टी केली. अत्याधुनिक युगात आपल्या अल्पवयीन मुलीचे कन्यादान केल्याबद्दल या मुलीच्या आईवडीलांवरही जोरदार टीका झाली होती.