धाराशिव – तुळजापूरच्या भवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयावरून दोन गटात वाद झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात ड्रेस कोड लागू झाला. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली. परंतु या मागणीला पाळीकर पुजारी मंडळाने विरोध दर्शवला. त्यामुळे या दोन्ही गटात वाद जुंपला आहे.
दरम्यान, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षनासाठी, श्रीतुळजाभवानी देवीच्या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिर संस्थानला ड्रेस कोड लागू करण्याचे निवेदन दिले. तसेच, महासंघाचे सदस्य किशोर गंगणे यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील यासंदर्भात निवेदन दिले. त्यामध्ये लिहले की, देशातील अनेक देवस्थानांमध्ये ड्रेसकोड लागू झाला आहे. त्यानुसार तुळजापूर मंदिरात नियम लागू करावा. याआधी मंदिरात ड्रेस कोड लागू होता, मात्र काही कारणाने तो रद्द केला होता. आता पुन्हा ड्रेसकोड लागू करावा. यावर पाळीकर पुजारी मंडळाने भूमिका मांडली की, महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी तर्कहीन आहे. याशिवाय देवीच्या मंदिरात भाविक कुलाचार पूजेसाठी येतात. कोणीही तोकडे कपडे घालत नाही. सर्व भाविक व्यवस्थित कपड्यांमध्ये येतात.त्यामुळे याठिकाणी वेगळ्या ड्रेस कोडची आवश्यकता नाही. याबाबत, जिल्हाधिकारी सचिन उंबासे म्हणाले की, यासंदर्भात दोन्ही गटांशी चर्चा करून, कायदेशीर आणि धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेऊ.