ताशी २५० किलोमीटर वेगाने धावणार समुद्राखालून बुलेट ट्रेन

मुंबई- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणार्‍या तंत्रज्ञानामुळे आणि बोगद्याच्या डिझाईनमुळे ताशी २५० किलोमीटर वेगाने समुद्राखालून ही बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रातील बीकेसी ते शिळफाटा २१ किमी लांबीच्या बोगद्याचे खोदकाम सुरू आहे. यामध्ये भारतातील पहिल्या ७ किमी लांबीच्या समुद्राखालील बोगद्यासह १६ किलोमीटरच्या बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्याच्या कामाची पाहणी काल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. यावेळी रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, भारतात पहिल्यांदा समुद्राखालील हा बोगदा बांधण्यात येत आहे. यापूर्वी आपण नदीपात्रातून जाणारा बोगदा बांधलेला आहे. हा बोगदा एक तांत्रिक अविष्कार आहे. या बोगद्यातून एकाच वेळी २ ट्रेन ताशी २५० किमीच्या वेगाने धावतील असे या बोगद्याचे डिझाईन करण्यात आले आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ३४० किलोमीटरचे काम प्रगतीपथावर आहे. नदीवर बांधण्यात येत असलेले पूल प्रगतीपथावर आहे. बीकेसीतील कामेही वेगात सुरु आहेत. जपानमधील तज्ज्ञही येऊन पाहणी करून गेले आहेत.
दरम्यान,मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर एकूण १२ स्थानके असणार आहेत. ५०८ किलोमीटरपैकी गुजरात आणि दादरा नगर हवेलीमध्ये ३५२ किमी तर महाराष्ट्रात १५६ किमी लांबीचा मार्ग असेल.या बुलेट ट्रेनचा वेग अंदाजे ३२० किलोमीटर प्रतितास इतका असून मुंबई-अहमदाबाद हे अंतर तीन तासात पार होणार आहे.बुलेट ट्रेनने बीकेसी ते ठाणे हे अंतर १० मिनिटांत, बीकेसी ते विरार २४ मिनिटे, बीकेसी ते बोईसर ३९ मिनिटांत पार केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top