पालघर – पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीजवळ एका कारखान्यात सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. तारापूर औद्योगिक क्षेत्रात बेटेगाव येथील प्लास्टिक उत्पादनांसह दोरखंड तयार करणाऱ्या रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज या कारखान्यातील गोदामाला आग लागली होती. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. सुमारे ३ तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.आग लागल्यानंतर कारखान्यातून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत होते.
मात्र, आग लागण्याचे स्पष्ट कारण अद्याप समजू शकले नाही. गोदामात साठा केलेल्या ज्वलनशील कच्च्या मालामुळे आग धुमसल्याने आकाशात मोठ्या प्रमाणात काळा धूर पसरला होता. आग लागल्याचे समजताच कारखाना आणि गोदाम परिसरातून कामगारांना वेळीच बाहेर काढले. यामुळे जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.