नंदुरबार- तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा परिसरात रात्री गारठा आणि दिवसा कडक उन्हाळा अशा बदलत्या वातावरणामुळे खरबुज पिकाला ‘मर’ तसेच बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे या फळपिकाची लागवड केलेल्या शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या १५ दिवसांपासुन या तालुक्यात खरबूज पिकाला मर तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून वेली सुकून खरबूजचे फळही खराब झाले आहे. काही शेतकर्यांकडून मल्चिंग पेपरवर ठिबकच्या सहाय्याने महागडी बियाणे आणून खरबुज पिकाची लागवड केली आहे. त्यांच्याकडून लागवड मजुरी, विविध खते, फवारणी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला होता. तसेच क्रॉप कव्हरही पिकांना लावण्यात आले होते. पण सध्याच्या या वातावरणामुळे क्रॉप कव्हर काढूनही पिकांना योग्य वातावरण नसल्याने त्याच्यावर मर तसेच बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्याने ही पिके खराब झाली असून फळेही वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.
तळोद्यात गारठा, कडक उन्हामुळे ‘खरबूज’ ला मर रोगाची लागण
