ठाणे – गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे आणि शहाड पाणी उपसा केंद्रातील नदी पात्रामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य होत नसून केवळ ५० टक्के पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.परिणामी काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. यातील ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी भातसा नदीच्या पात्रावर पिसे येथे तर, स्टेम प्राधिकरणाने उल्हास नदीच्या पात्रावर शहाड येथे पाणी उपसा केंद्र उभारलेले आहे. या दोन्ही केंद्रावरून गाळ आणि कचर्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसल्याने पुरेशा प्रमाणात पाण्याचा उपसा होत नाही. परिणामी ठाणे शहरात सुमारे ५० टक्के कमी पाणी पुरवठा होत आहे.