वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाहीर सभेत गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाले. अमेरिकेची प्रमुख तपास संस्था एफबीआयने हल्लेखोराचे दोन फोटो प्रसिध्दी माध्यमांना दिले आहेत.
थॉमस क्रुक्स नावाच्या या अवघ्या वीस वर्षे वयाच्या तरुणाने रविवारी पेन्सिल्व्हेनिया येथील सभेला संबोधित करीत असताना ट्रम्प यांच्यावर गोळया झाडल्या.त्यातील एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली.हा हल्ला होताच अवघ्या काही सेकंदात ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी थॉमसचा खात्मा केला.
डोळ्यावर चष्मा असलेला थॉमस निरागस दिसतो. त्याच्याकडे पाहून त्याने देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षाची हत्या करण्याचा प्रयत्न केला असेल असे वाटत नाही,अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर बहुतांश लोकांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की थॉमस शांत स्वभावाचा होता. त्याला एकटे राहणे आवडायचे. २०२२ मध्ये त्याने बेथेल पार्क हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली होती.त्याने राष्ट्रीय गणित आणि विज्ञानविषयक स्पर्धेत ५०० डॉलर्रचे स्टार अवॉर्डही मिळविले होते.५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तो मतदान करणार होता.