ओटावा – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे ५१वे राज्य बनवण्याबद्दल केलेल्या विधानानंतर आता कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला प्रत्युत्तर दिले आहे. कॅनडातील या अधिकाऱ्याने ट्रम्प यांना उलट दोन अमेरिकन स्टेट विकत घेण्याची ऑफर दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्याकडून कॅनडावर टीका केली जात आहे. तसेच ट्रम्प यांनी कॅनडाला युनायटेड स्टेट्समधील ५१ वे राज्य बनवण्यासाठी आर्थिक शक्ती वापरण्याची धमकी देखील दिली आहे. यादरम्यान सोमवारी ओंटारियो प्रेमियर डग फोर्ड यांनी ट्रम्प यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना फोर्ड यांना ट्रम्प यांनी कॅनडाचे विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर फोर्ड म्हणाले की, “अध्यक्षांना, मी एक काउंटर ऑफर करीन. जर आम्ही अलास्का विकत घेतलं तर कसं राहिल? आणि आम्ही यामध्ये मिनेसोटा आणि मिनियापोलिसचाही समावेश करू?”.ते पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे की हे वास्तवाला धरून नाही. मला माहिती आहे की अशी वक्तव्य करणे आणि विनोद करणे त्यांना आवडे, मी हे गांभीर्याने घेतो. ते कदाचित विनोद करत असतील, पण माझ्या निगराणीखाली हे होणे कधीही शक्य नाही”, असेही फोर्ड म्हणाले