नवी दिल्ली – केंद्र सरकार आता वैमानिकांप्रमाणे देशातील ट्रक चालकांनाही ८ तासांची ड्युटी लागू करण्याचे धोरण आखत आहे. दिवसरात्र न थकता वाहन चालविण्याने ट्रक चालकांवर ताण येऊन अपघात घडतात. त्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे स्वतः या योजनेवर गांभीर्याने काम करत आहेत.
केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रक चालकांना आता पूर्ण झोपून व आराम करून ट्रक चालविण्याचे धोरण तयार केले जात आहे. कारण ट्रक चालक हे गाडीतील माल वेळेत पोहोचविण्यासाठी सलग २४ ते ४८ तास वाहन चालवतात. त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने अपघाताची शक्यता असते. त्यामुळे आता ट्रक चालकांना ८ तासानंतर योग्य प्रमाणात विश्रांती देणे गरजेचे आहे. त्यासाठी ट्रक उत्पादन करतानाच ट्रकमध्ये एक खास यंत्र बसवले जाणार आहे. चालकाला ट्रक चालविण्याआधी आपली विशेष कार्डवाली चावी त्या यंत्राला लावावी लागेल. त्यानंतर कोणताही ट्रक चालक ८ तासापेक्षा अधिक काळ तो ट्रक चालवू शकणार नाही. त्याला त्यावेळी विश्रांती द्यावी लागेल. तसे केले नाहीतर विशेष चावीवाले यंत्र ट्रकला अलार्म देईल आणि ट्रक बंद पडेल. त्यानंतर दुसर्या चालकाला आपल्या विशेष कार्डवाल्या चावीचा वापर करून पुन्हा तो ट्रक सुरू करता येईल.
ट्रक चालकांनाही ८ तास ड्युटी! सरकार नव्या धोरणाच्या तयारीत
