मुंबई – अधिक व्याजाचे अमिष दाखवून हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये बुडवणाऱ्या टोरेस कंपनीचे सूत्रधार एक युक्रेनची एक महिला व एक पुरुष असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेच या गैरव्यवहाराचे मास्टरमाईंड असून परदेशात पळून गेल्याचे आर्थिक गुन्हे तपास खात्याने म्हटले आहे.आर्थिक गुन्हे तपास शाखेने म्हटले आहे की, या फसवणूकी संदर्भात युक्रेनचे नागरिक असलेल्या अर्टेम व ओलेना स्टोईन यांच्यावर लवकरच लुकआऊट नोटीस जारी केली जाणार आहे. ते देशाबाहेर पळून गेलेले असून फसवणूक प्रकरणात त्यांच्यासह या कंपनीचे प्रमोटर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनीही त्यांच्या विरोधात फसवणूक, फौजदारी कट कारस्थान आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये टोरेस ज्वेलर्स नावाने दागिन्यांची विक्री करणाऱ्या प्लॅटिनम हेर्न लिमिटेडचे संचालक सर्वेश अशोक सुर्वे, विक्टोरिया कावालेनको, मुख्य कार्यकारी अधिकारी तौसिफ रियाज व्यवस्थापक तानिया कासाटोव्हा आणि व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे.
या प्रकरणात पोलिसांकडे आतापर्यंत एकूण १,५३५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणातील पहिली तक्रार नरिमन पॉइंट येथील भाजीविक्रेता प्रदीप कुमार वैश्य याने केली होती. दरम्यान, टोरेस ज्वेलर्स या कंपनीने त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखापरिक्षक यांच्या विरोधात त्यांच्या संकेतस्थळावर चोरीचा आरोप केला आहे. या संकेतस्थळावर कंपनीतून काही गोष्टी चोरत असल्याचा व्हिडिओही प्रदर्शित केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस प्रकरणात कालपर्यंत कंपनीच्या विविध शाखांमधून सुमारे ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच कंपनीकडून बक्षीस स्वरूपात गाडी स्वीकारणार्या १५ गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
टोरेसप्रकरणी दादरमधील कंपनीच्या शाखेत शोधमोहीम राबविण्यात आली आहे. कंपनीने १५ वाहने विकत घेतल्याचे आणि ५ वाहने आरक्षित केल्याचे पुरावे सापडलेत. आरोपींनी दादर येथे टोरेस कंपनीची शाखा सुरू करण्यासाठी प्रति महिना २५ लाख रुपये भाड्याने जागा घेऊन तेथे शो रूम उघडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जागा मालकाकडे चौकशी करीत आहेत. मालकाने केलेला भाडेकरार, रकमेचा व्यवहार आदी तपशिलाची चौकशी केली जात आहे.