ज्येष्ठ मराठी साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

मुंबई – ज्येष्ठ मराठी साहित्यिक, पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज पहाटे वसईतील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.फादर दिब्रिटो हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वसईच्या जेलाडी येथील निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सायंकाळी ४ वाजल्यापासून नंदाखाल येथील चर्चमध्ये ठेवण्यात आले. सायंकाळी ६ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले,अशी माहिती बिशप हाऊसमधून देण्यात आली.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म ४ डिसेंबर १९४२ रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल गावी झाला. त्यांनी १९८३ ते २००७ या कालावधीत सुवार्ता या प्रामुख्याने मराठी ख्रिस्ती समाजाशी संबंधित असलेल्या नियतकालिकाचे मुख्य संपादत होते. फादर दिब्रिटो यांचे शिक्षण नंदाखाल येथील सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाले.त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात पदवी तर धर्मशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. १९७२ साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली.फादर दिब्रिटो हे पर्यावरण रक्षणासाठी आग्रही होते. पर्यावरणाशी संबंधित अनेक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.समाजातील वाढत्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती.सुवार्ता या नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे अनेक विषय हिरीरीने मांडले.त्यामुळे सुवार्ता हे केवळ ख्रिस्ती धर्मियांपूरते मर्यादित न राहता त्याने मराठी साहित्यातही स्वतंत्र ठसा उमटविला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top