मुंबई – एच. डी. गावकर सेवा संस्था या मुंबईसह कोकण विभागात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवर संस्थेतर्फे येत्या २५ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृह, के.ई.एम. रूग्णालयाजवळ, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई येथे मध्य मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांसाठी पूनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदीबाबत कायदेशीर मार्गदर्शन करणारी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितानी या कार्यशाळेत सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन एच. डी. गावकर सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम आणि सचिव सौरभ उल्हास गावकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
मध्य मुंबईतील दादर-परळ-लालबाग-शिवडी आदी परिसरात जुन्या चाळी आणि सहकारी गृहनिर्माण सोसायट्या मोठ्या संख्येने आहेत. त्यापैकी अनेक चाळी आणि इमारती या चाळीस-पन्नास वर्षाहून अधिक काळ जुन्या आहेत. त्यातील बऱ्याच जुन्या चाळी व सोसायट्या पुनर्विकासासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातील सदस्यांना पूनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदीबाबत कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. पुनर्विकासाची प्रक्रिया पार पाडताना विकासकाशी होणारे वाद टाळणे आणि पुनर्विकास प्रक्रिया सुलभ तसेच पारदर्शक ठेवणे फार महत्त्वाचे असते. या संदर्भात योग्य मार्गदर्शन होणे हेही तेवढेच गरजेचे आहे. त्याकरीता एच. डी. गावकर सेवा संस्था या संस्थेतर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सुप्रसिध्द कायदेतज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस् महासंघ मर्यादित या संघटनेचे तज्ज्ञ संचालक ॲड. श्रीप्रसाद परब (बी.ई.सिव्हिल, एल.एल.एम.) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान व प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल, अशी माहिती प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.